पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची पोकळ डरकाळी

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

पाकिस्तानमध्ये नेहमी तीन सत्ता केंद्र असतात हे आपण जाणतोच. पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर हे ते तीन सत्ताकेंद्र आहेत. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणजेच सरकार हे केवळ नाममात्र सत्ताकेंद्र असते खरी सत्ता ही आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर यांचीच असते. जो पंतप्रधान या दोन संस्थांच्या कलेने सत्ता चालवतो तोच पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसतो जर त्याने या दोन संस्थांना झुगारून सत्ता चालवली तर त्याला खुर्ची सोडावी लागते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना याच कारणामुळे खुर्ची सोडावी लागली होती. इम्रान खान पंतप्रधान असताना मुनिर खान हे आयएसआयचे प्रमुख होते. त्यावेळी या दोघांत विळ्या भोपळ्याचे नाते होते त्यामुळेच इम्रान खान यांना सत्ता सोडावी लागली आता तेच मुनिर खान पाकिस्ताचे नवे लष्करप्रमुख बनले आहेत. पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांच्या निवृत्तीनंतर मुनिर खान यांची पाकच्या लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी निवड होताच मुनिर खान यांनी भारताला इशारा देताना पाकिस्तान भारतासोबत युद्ध करण्यास सज्ज आहे असे म्हटले आहे. अर्थात यात नवे काही नाही पाकिस्तानात जो कोणी लष्कर प्रमुख बनतो तो पहिल्यांदा अशीच पोकळ डरकाळी फोडतो मात्र परिस्थिती त्याहून विपरीत असते.

आजच्या घडीला पाकिस्तान भारतासोबत युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाही हे शेंबडे पोर ही सांगू शकेल कारण आज पाकिस्तानच गृहयुध्दाच्या तोंडावर उभा आहे. आयएसआय आणि लष्कराच्या जुलमी राजवटीला पाकिस्तानची जनता कंटाळली आहे. पाकिस्तानी जनतेला विकास हवा आहे म्हणूनच इम्रान खान यांनी काढलेल्या लॉंग मार्चला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे आयएसआय आणि लष्कराच्या हातातले बाहुले असून ते पाकिस्तानचा विकास करू शकत नाही असा ठाम विश्वास जनतेत निर्माण झाला आहे म्हणून ते या सरकार विरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलने करत आहे या आंदोलनांना इम्रान खान हवा देत आहेत म्हणूनच इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील करण्यात आला होता. हा हल्ला आयएसआय आणि लष्कराने घडवून आणला असा थेट आरोप इम्रान खान यांनी केला होता या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये गृहयुध्दाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे भारताशी युद्ध करण्याआधी पाकिस्तानी लष्कराला आधी आपल्या देशातील हे संभाव्य गृहयुद्ध रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)

पाकिस्तानी लष्कराने भारताशी युद्ध करण्याची पोकळ डरकाळी फोडण्यापेक्षा पाक – अफगाण सीमेवर काय जळत आहे हे आधी पाहावे. कारण अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार हेच सध्या पाकिस्ताची मोठी डोकेदुखी ठरत आहे. जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली तेंव्हा सर्वाधिक आनंद पाकिस्तानला झाला होता. तालिबानला सोबत घेऊन भारतीय सीमा अस्थिर ठेवण्याचा डाव पाकिस्तान रचत होता मात्र झाले उलटेच तालिबानी सरकारने भारताशी पंगा न घेता पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमाच अस्थिर करण्यास सुरुवात केली. काबुलमधील पाकिस्तानी वकालतीवर नुकताच हल्ला झाला या हल्ल्यात पाकिस्तानचे राजदूत उबेर उर रहेमान यांची हत्या झाली. खारेसन इस्लामीक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे विशेष म्हणजे या हल्ल्याच्या तालिबानी सरकारने साधा निषेधही केला नाही यामुळे या हल्ल्याला तालिबानचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते.

तालिबानचा एक मोठा गट पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कार्यरत असून तो भाग अफगाणिस्तानात सामील करून घेण्याचा त्यांचा मनसुबा आहे. शिवाय बलुचिस्तान प्रांतातील नागरिकही स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्राची मागणी करत रस्त्यांवर उतरत आहेत त्यामुळे भारताशी युद्ध करण्याची पोकळ डरकाळी फोडण्यापेक्षा आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे आधी पाकच्या नव्या लष्करप्रमुखांनी पाहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here