स्पॉटलाईट: सकारात्मक बदल  

श्याम बसप्पा ठाणेदार        

दौंड जिल्हा पुणे  

मो: ९९२२५४६२९५

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते कारण या शतकात अनेक क्रांतिकारक शोध लागले त्यातीलच एक शोध म्हणजे मोबाईलचा शोध. मोबाईलचा शोध लागल्यापासून अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. पूर्वी मोबाईल हे फक्त संदेशाच्या देवाणघेवाणीपुरतेच मर्यादित साधन होते. त्याचा वापरही मर्यादितच होता मात्र मोबाईलमध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि मोबाईल ही गरजेची वस्तू न राहता चैनीची वस्तू बनली. मोबाईलचा वापर मर्यादित आणि कामापूरता केला तर त्याचे अनेक फायदे आहेत मात्र अलीकडे सोशल मीडिया आल्यापासून मोबाईलचा अतिरेकी वापर होऊ लागला आहे. भारतात तर मोबाईलचा अतिरेकी वापर ही मोठी समस्या बनली आहे. एकवेळ जेवायला नाही मिळाले तरी जगेल मात्र मोबाईल शिवाय जगू शकणार अशी आपली अवस्था झाली आहे. आपली तरुण पिढीतर मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहे की एक क्षण देखील ते मोबाईल पासून दूर राहू शकत नाही. 

तरुण पिढीच्या या मोबाईल व्यसनावर समाज तज्ज्ञांनिही चिंता व्यक्त केली असून हे मोबाईलपवेड असेच कायम राहिले तर भविष्यात तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशाराच समाज तज्ज्ञांनी दिला आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर ही केवळ आपल्याच देशाची समस्या आहे असे नाही तर जगभर ही समस्या आहे. भारतात मात्र ही समस्या अधिक प्रमाणात आहे. मोबाईल वापरात भारतीय जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय दररोज सरासरी चार तास मोबाईल वापरतात. मोबाईल वापरकर्त्यांमध्ये शालेय विद्यार्थीही मागे नाहीत कोरोना काळापासून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेक समस्याही उदभवू लागल्या आहेत त्यामुळेच अमेरिकेतील काही शाळांनी शाळेत मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. आपल्या महाराष्ट्रातही एका गावाने मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी गावातील ग्रामपंचायतिने १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गावतील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. बांशी ग्रामपंचातीचा हा निर्णय स्वागतार्ह असून सर्वत्र याचे स्वागत होत आहे. मोबाईलचा मुलांवर सकारात्मक नव्हे तर नकारात्मकच परिणाम होत आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांमध्ये नकारात्मकता वाढत चालली आहे. मुले चिडखोर बनली आहेत. मोबाईल मिळाला नाही तर मुले हिंसक होत आहेत. मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यावर ताण येत आहे त्यामुळे अनेक मुलांना लहान वयातच चष्मा लागत आहे. मोबाईलमुळे मुलांची ग्रहण क्षमताही कमी होऊ लागली आहे त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर झाला आहे. 

काही वर्षांपूर्वी मैदाने मुलांनी ओसंडून व्हायचे. मुले मैदानावर जाऊन मैदानी खेळ खेळत त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमताही वाढत अलीकडे मात्र मुले मैदानावर कमी आणि मोबाईलमध्येच अधिक दिसतात. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलांना मोबाईलवर खेळ खेळण्यात आनंद वाटत आहे त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य बिघडत चालले आहे. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाही वाढत चालला आहे. या सर्व समस्यांचे एकमेव कारण म्हणजे मोबाईल. 

बांशी ग्रामपंचायतीप्रमाणे इतरही ग्रामपंचायतिने १८ वर्षाखालील मुलांच्या मोबाईल बंदीचा निर्णय घेतला तर ते मुलांच्या हिताचे ठरेल. बांशी ग्रामपंचायतीप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील जेकुकरवाडी या गावाने देखील संध्याकाळी ६ ते ८ टीव्ही, मोबाईल सह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्यावर बंदी घातली आहे. संध्याकाळी ६ ते ८ हा वेळ फक्त मुलांच्या अभ्यासासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या दोन तासात मुलांचे पालकही मुलांसोबत बसून मुलांचा अभ्यास घेतात. सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव या गावाने देखील संध्याकाळी सात ते साडेआठ दरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर बंदी घातली आहे. बांशी, जेऊकरवाडी आणि मोहित्यांचे वडगाव या गावांनी घेतलेले हे निर्णय सकारात्मक असून मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय योग्य आहेत. या तिन्ही गावांचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. या तिन्ही गावाचे अनुकरण राज्यातील इतर गावांनी केले तर मुलांच्या मोबाईलचे व्यसन सुटेल आणि नवी पिढी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here