परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन प्राध्यापकाने केले विद्यार्थ्याला ब्लॅकमेल, घाबरलेल्या मुलाची आत्महत्या

52

परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन प्राध्यापकाने केले विद्यार्थ्याला ब्लॅकमेल, घाबरलेल्या मुलाची आत्महत्या

 मुंबई:- परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या एका प्राध्यापकामुळे अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्याला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापकाला बुधवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना डोंबिवली येथील आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थी डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिकत होता. 14 फेब्रुवारी 2020रोजी त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण असावं, याचा शोध पोलीस आणि त्याचे पालक घेत होते.

त्याच्या वडिलांनी त्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापकाविरुद्ध तक्रार केली. त्यांच्या आरोपांनुसार, या प्राध्यापकाने या विद्यार्थ्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न मिळाल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकीही दिली होती.

या धमकीमुळे विद्यार्थी मानसिक तणावात होता. याच तणावग्रस्त मानसिक अवस्थेत त्याने आत्महत्या केली, असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. या प्रकरणी या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.