ट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, तर पत्नी गंभीर
• मूल-बोरचांदली मार्गावरील घटना
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
मूल : 1 जानेवारी
भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मूल-बोरचांदली मार्गावर 1 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. गणपत मारोतराव आगडे (54) असे मृत्यमुखी पडलेल्या पतीचे, तर सुरेखा अगडे असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे. नवीन वर्षाचे सर्वत्र स्वागत होत असताना आगडे कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला.
मूल येथील गणपत आगडे हे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या दुचाकीने (एम.एच. 34 ए.पी. 6922) पत्नी सुरेखा हिला घेऊन तालुक्यातील फिस्कुटी येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात होते. वाटेतच उमा नदी असल्याने घरी देवाला वाहिलेले निर्माल्य नदीत विसर्जित करण्याच्या हेतूने पुलावर थांबले. तेवढ्यात मुलकडून चामोर्शी मार्गे जाणारी ट्रॅक्टर (ट्रॉली क्रमांक एमएच 33 एएफ 4064) ने त्यांना पुलावर धडक दिली. ट्रॅक्टरसह गणपत नदीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक किशोर पोरटे जखमी असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सतिशशिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कोसमशिले करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पाच भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
मूल-चामोर्शी मार्गावर मूलपासून दिड कीलोमीटर अंतरावर उमा नदी आहे. नदीच्या पुलावर दोन्ही बाजूला कठडे नाहीत. ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील वर्षीसुद्धा पावसाळ्यात अशीच एक घटना घडली होती. तेव्हाच उमा नदीच्या पुलावर दोन्ही बाजूला कठडे करावे, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली होती. कदाचित बांधकाम विभागाने कठडे लावले असते. तर आगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता, असे बोलल्या जात आहे. आतातरी बांधकाम विभागाने उमा नदीच्या पुलावर व त्यासमोर असलेल्या नाल्याच्या पुलावर कठडे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.