समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच

49

समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

हिरामण गोरेगावकर

6 जानेवारी 2023

बुलढाणा – मोठ्या थाटामाटात उदघाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वरून नागपूरच्या दिशेने जात असताना वाशिमच्या कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात झाला ही घटना ताजी  असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.  

या अपघात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. समृद्धी महामार्गावर चॅनेज 327.8 जवळ नागपूर कॉरिडॉर वर रात्री हा अपघात झाला. दोन ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय.

एक ट्रक औरंगाबाद हुन नागपुरच्या दिशेने जात असताना चालकाला अचानक झोप लागली त्यामुळे हा ट्रक सुरक्षा भिंतीवर आदळून महामार्गाच्या आकस्मित लेन मध्ये पलटी झाला त्या मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला हा अपघातग्रस्त ट्रक न दिसल्याने मागून येणारा हा ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळला.

या ट्रकचा चालक ज्ञानेश्वर कातकडे रा.पैठण हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून महामार्गावरील ट्रक क्रेनच्या साहायाने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमी चालकांवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.