काळजाला भिडते ती कविता अक्षर असते- ज्येष्ठ कवी सुभाष कवडे

55

काळजाला भिडते ती कविता अक्षर असते- ज्येष्ठ कवी सुभाष कवडे

काळजाला भिडते ती कविता अक्षर असते- ज्येष्ठ कवी सुभाष कवडे

पूनम पाटगावे

महाराष्ट्र :- व्यवस्थेमधल्या दोषांच्याविरोधात कवींनी लिहावे. काळजाला भिडते ती कविता अक्षर असते. कविता ही समाजमनावर शाश्वत मूल्यांची पेरणी करते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी पेठ (ता. वाळवा) येथे केले. वाढत्या शिक्षणाबरोबर अदृश्य जातीयवादही वाढतोय, असेही ते म्हणाले.
पेठ येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न ग.रा.पाटील संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष रघुराज मेटकरी, कवयित्री नंदिनी साळुंखे-पाटील, भारती पाटील प्रमुख उपस्थित होते.
कवडे म्हणाले, “साहित्य समाजाचे हित करते. समाजाच्या सर्व क्षेत्रांना साहित्य स्पर्श करते. संतांनी समाजपरिवर्तन करण्यासाठी कवितेचाच आधार घेतला. कविता साधी, सोपी असावी. कवितेच्या आकारापेक्षा आशयाला महत्त्व आहे. काळीज भरलेलं असेल तर कविता येते. संवेदनशील मन हा काव्यलेखनाचा पाया असतो. व्यथा, वेदना यात कविता आहेच; परंतु अत्युच्च आनंदाचा क्षणही कवितेत आल्याशिवाय राहात नाही. मन रिते करण्यासाठी कविता हे एकमेव माध्यम आहे. कवितेला गुणवत्तेशिवाय कोणतेही मोजमाप नाही. इतरांच्या कवितांचा आदर करा. चांगले आणि सकस वाचल्याशिवाय विचारांना धुमारे फुटत नाहीत. चांगले वाचूया, चांगले लिहुया.” श्री. कवडे यांनी सादर केलेली परतीचा पाऊस तसेच बाबासाहेब हेरवाडे यांची ‘अजब झालं देवा, तुझं कोडं सुटेना’, विश्वनाथ गायकवाड यांची ‘मी गडबडलेली नसता भानात, पाऊस भेटला मज आडरानात’, ऋजुता माने यांनी ‘आई मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचाय’, सुनील नायकल यांची ‘ज्यांनी विरोध केला त्यांचे आभार मानतो मी’ या कवितांना विशेष दाद मिळाली. यावेळी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार प्राप्त कवी बाबा जाधव, सुधाकर कुपवाडकर, भारती पाटील, शिवाजी दुर्गाडे, सुमन दुर्गाडे, अभिषेक माळी, पूनम सावंत, सुहास पंडित, नथुराम कुंभार, अशोक पवार, अली मुलाणी, सांगोला येथील खंडू भोसले, समाधान मोरे, अनिल केंगार, स्मिता कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, सांगली, रमेश गायकवाड, मोहन खोत, बाबासाहेब हेरवाडे, भीमराव कुंभार, रघुनाथ मेटकरी, प्रा.विश्वनाथ गायकवाड, अनिल ढेकळे, सुरेश थोरात, ऋतुजा माने, नंदिनी साळुंखे-पाटील, आर. बी. कोकाटे, वैष्णवी जाधव, मनतशा पठाण, धर्मवीर पाटील, सुनील नायकल, मनीषा कुरणे, तानाजी नांगरे,प्रा. सिंधू कचरे, सुरेखा गावडे, वसंतराव कुलकर्णी, शंकर पाटील, शांताराम देशमाने, शायर नजीर मुल्ला, चंद्रशेखर तांदळे, शंकर पाटील, दिलीप गिरीगोसावी, महादेव हवालदार, मेहबूब जमादार अशा पन्नास कवींनी आपल्या कविता सादर केल्या. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
संमेलनाचे संयोजन पंडित लोहार, श्रीरंग कदम, माळी, सुनीता कुलकर्णी, डॉ. एम एम जमादार, शंकर पाटील, तानाजी नायकल, प्रभाकर पाटील, अमर माने यांनी केले.