स्पॉटलाईट: काश्मीरमध्ये निवडणूक?

47

स्पॉटलाईट: काश्मीरमध्ये निवडणूक?

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

जम्मू काश्मीरचे विभाजन केले तेंव्हाच सरकार या भागात निवडणुका घेणार हे निश्चित झाले होते. केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला तशा सूचनाही दिल्या होत्या. निवडणुका आयोगाने केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ फेररचनेच्या शिफारशी ( परिसीमन ) केल्या आहेत. या शिफारशीनुसार ९० सदस्यांच्या विधानसभेत काश्मीरच्या ४७ जम्मूच्या ४३ जागा असतील तर लोकसभेच्या ५ जागा असतील. विसर्जित विधानसभेत एकूण ८७ सदस्य होते. त्यात जम्मूचे ३७ काश्मीरचे ४६ तर लडाखचे ४ सदस्य होते. नवीन रचनेत जम्मू विभागात विधानसभेच्या ६ जागा वाढतील तर काश्मीर विभागात १ च जागा वाढेल. जम्मू हा हिंदू बहुल भाग आहे. तेथील सदस्य संख्या वाढली तर त्याचा फायदा भाजपला होईल म्हणून जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला होता मात्र निवडणूक आयोगाने आता सर्व पक्षांच्या शंकांचे निरसन केल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असा कयास बांधला जात आहे. राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बी. एल संतोष यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीस लागण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सांगताही काश्मीरमध्येच झाली त्यामुळे जम्मू काश्मीरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा लाभ काँग्रेसला निवडणुकीत होईल अशी आशा काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अल्ताफ बुखारी नावाच्या एका स्थानिक काश्मीरी नेत्याने अपनी पार्टी नावाने नवीन पक्ष स्थापन केला असून या पक्षाची आणि भाजपची जवळील वाढली आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि अपनी पार्टी यांच्यात युती होईल असे वक्तव्य अल्ताफ बुखारी यांनी व्यक्त केले आहे तसे झाले तर त्याचा भाजपलाच जास्त लाभ होईल. काही करून यावेळी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे सरकार आणायचेक असा चंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बांधला आहे त्यासाठी भाजप कडून व्यापक प्रमाणात जनजागण मोहीम राबविण्यात येणार असून मोदी सरकारच्या योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनेतून झालेल्या बदलांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारली जाणार आहे.

पीडीपी च्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या देखील छोट्या मोठ्या सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स च्या उमर अब्दुल्ला यांनी देखील आमचा पक्ष निवडणूकीवर बहिष्कार घालणार नसून निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी देखील कार्यकर्त्यांना निवडणुकीस तयार राहण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसमधून फुटून स्वतःचा पक्ष स्थापन केलेले गुलाम नबी आझाद हे सध्या शांत असले तरी निवडणूक जवळ येताच ते ही सक्रिय होतील.

भाजपची त्यांची जवळीक पाहता ते ही भाजपशी युती करू शकतात तसे झाले तर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच भाजपची सत्ता येऊ शकते. कदाचित जम्मू काश्मीरला पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री मिळू शकतो. निवडणुकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा कालावधी असला तरी सर्व पक्ष निवडणूक मोडमध्ये पोहचले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केल्याने राजकीय पक्षांना त्याचा लाभ मिळणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणार असतील तर त्याचे सर्वसामान्य नागरिक स्वागतच करतील. आपल्या देशात लोकशाही आहे आणि निवडणूक हाच लोकशाहीचा पाया आहे. निवडणुकीद्वारेच मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात. मागील काही वर्षात जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या त्या जर झाल्या तर जम्मू काश्मीरमध्येही लोकशाहीची नवी पहाट उगवेल यात शंका नाही.