के सी आर यांचा पक्षही महाराष्ट्रात निवडणूक लढवणार ?

श्याम ठाणेदार

 दौंड जिल्हा पुणे

 मो: ९९२२५४६२९५

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष के सी राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून सीमोल्लंघन केले. के सी राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या पक्षाची बैठक बोलवली होती या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समितीचे २८३ आमदार खासदार व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत के सी आर यांनी आपला पक्ष राष्ट्रीय राजकाणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली इतकेच नाही तर त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरणही केले.

राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या त्यांच्या घोषणेचे उपस्थित सर्व आमदार खासदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले होते विशेष म्हणजे के सी आर यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणाची सुरवात महाराष्ट्रातून केली आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी लढा देणाऱ्या के सी आर यांच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर पक्ष विस्ताराची सुरवात ते महाराष्ट्रातून करणार असून त्यादृष्टीने या पक्षाकडून महाराष्ट्रातील काही जागा लढविण्यात येणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचा समावेश आहे.

अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी के सी आर यांची भेट घेतली होती. या भेटीत के सी आर यांनी दीपक आत्राम यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. आता हा पक्ष प्रवेश उद्या म्हणजे ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये होण्याची शक्यता आहे. या पक्ष प्रवेशानंतर दीपक आत्राम हे अहेरीमधून बी आर एस पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. दीपक आत्राम सारखा माजी आमदार असलेला मोहरा गळाला लागल्याने के सी आर जाम खुश आहे. अहेरी मतदार संघाचा बराचसा भाग तेलंगणा सीमेला लागून आहे. त्या भागात तेलगू भाषिक नागरिक मोठ्या संख्येने आहेत. त्यादृष्टीने बी आर एस ने त्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

केवळ गडचिरोलीच नव्हे तर विदर्भ आणि मराठवाड्यावर देखील के सी आर यांचे लक्ष आहे. विदर्भ आणि मराठवाडा हे राष्ट्रीय राजकारणात शीरण्याची कवाडे असल्याचे के सी आर यांचे मत आहे त्यामुळेच त्यांनी या भागात कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यास सुरवात केली असून इतर पक्षातील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची योजना त्यांनी आखली आहे. के सी आर यांनी महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी राजकारणातील जाणकार व्यक्तींना मात्र याचे जराही आश्चर्य वाटले नाही कारण मागील दोन वर्षात के सी आर यांनी जे राजकारण केले आहे ते राष्ट्रीय राजकारणात उडी घेण्याचेच निदर्शक होते.

विशेषतः के सी आर यांनी तेलंगणामध्ये जेंव्हा दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आले तेंव्हापासून ते स्वतःला राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू मानू लागले आहेत. सुरवातीला म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी मोदींशी जुळवून घेतले आणि काँगेस व चंद्राबाबू नायडू यांच्याशी पंगा घेतला मात्र तेलंगणामधून काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष कमकुवत झाले तसे त्यांनी भाजपला प्रमुख विरोधक मानून भाजपला विरोध सुरू केला. के सी आर यांचा भाजप विरोधाला केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाचीही किनार आहे ती अशी की, केंद्रात भाजपला प्रमुख विरोधक असलेली काँग्रेस गलितगात्र झाली आहे अशावेळी विरोधी पक्षांची मोट बांधून विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व आपल्या हाती आले तरी आपण २०२४ ला पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू असे स्वप्न त्यांना पडत आहे त्यामुळेच गेली काही दिवस ते सातत्याने विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

मागील काही महिन्यात त्यांनी सोनिया गांधी, शरद पवार, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन, ममता बॅनर्जी या विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०२४ साली भाजप समोर एक पर्याय उभा करावा असे त्यांनी या नेत्यांना सांगितले आहे. प्रसंगी विरोधी पक्षांची आघाडी करून त्या आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. विरोधी पक्षांची आघाडी करून भाजपला शह देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी तो वाटतो तितका सोपा नाही कारण वर उल्लेख केलेले सर्वच नेत्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे.

२०२४ साली जर विरोधी आघाडीचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक झाले तशी होण्याची शक्यता नाहीच तरीही समजा तसे झाले तरी वर उल्लेख केलेले नेते के सी आर यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही. शिवाय वर उल्लेख केलेल्या सर्वच नेत्यांची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे ते किती काळ एकत्र राहतील हा प्रश्नच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी करणे आणि तिचे नेतृत्व करणे हे के सी आर यांचे स्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांची जागा घेण्याची के सी आर यांची महत्वाकांक्षा म्हणूनच हास्यास्पद ठरते. राजकीय नेत्यांच्या मनी महत्वाकांक्षा हवीच मात्र अशी महत्वाकांक्षा बाळगताना स्वतःचे हसे होणार नाही याचीही काळजी राजकीय नेत्यांनी घ्यायला हवी. राष्ट्रीय राजकारणात उतरून के सी आर यांनीही असेच स्वतःचे हसू करून घेतले आहे काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here