आय. एस. ओ. ग्राम पंचायत दुष्मि खारपाडा मधील आदिवासींची शुद्ध पाण्यासाठी धडपड, दोन वेळा जलवाहिन्या टाकून पाणी आलेच नाही. शासनाचे लाखो रुपये वाया गेल्याचा आदिवासी महिलांचा आरोप.

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आय. एस. ओ. प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि हद्दीतील आदिवासींची शुद्ध पाण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे ह्या आय.एस.ओ ग्रामपंचायतीमध्ये सध्या कोट्यावधी रुपयांची जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. ” जल जीवन मिशन हे लोकसहभागीय पद्धतीने राबविण्याचे स्पश्ट निर्देश असतानाही ह्या योजनेसाठी ग्रामस्थांना विशेष म्हणजे आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता राबविण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असून या योजनेत आम्हाला काय हवं नको, हे न विचारता गृहीत धरून योजनेचे काम सुरू असल्याचे ” वडमाल वाडीतील आदिवासी महिलांनी सांगितले आहे.याबाबत त्यांनी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, रा. जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि ग्रामपंचायत सरपंच यांना लेखी कळविले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे येथील वडमालवाडी आदिवासी वाडीत या अगोदर दोन वेळा पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र ह्या पाईपलाईन मधून एकदाही पाणी आले नाही.तसेच ही लाईन जमिनीत गाडलेली नसल्यामुळे वणव्यामध्ये जळून गेल्याचे निदर्शनात येत आहे.त्यामुळे या जलवाहिन्यांसाठी वापरण्यात आलेला शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.यास जबाबदार कोण? याचा शोध शासन घेईल का?असा प्रश्न या आदिवासी बांधवांकडून विचारला जात आहे.तर दुसरीकडे या ग्रामपंचायत हद्दीतील इतर सर्व गावांना जल उद्भव स्त्रोत म्हणून सिडकोच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा होत असताना, फक्त आमच्या वडमाल वाडीतील आदिवासींना एका जीर्ण अवस्थेतील विहिरीवरून पाणीपुरवठा करणे किंवा खैरासवाडीतून पुन्हा एकदा तशाच पद्धतीने जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करणे, हे तात्काळ थांबवून वडमालवाडी आदिवासी वाडीसाठी सिडको जलवाहिनीचेच उद्भव स्त्रोत घेऊन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे. 

 याबाबत त्यांनी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रायगड जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व ग्रामपंचायत दुष्मि सरपंच यांच्याकडे केली आहे. दरम्यान वडमलवाडी साठी सध्या ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेली साठवण टाकी ही मयत दगड्या बापू कातकरी या आदिवासी बांधवाच्या खाजगी जागेत बांधली जात असून त्यांचे वारस पांडुरंग गणपत सवार यांची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचे सांगत या अगोदरही विनापरवानगी ग्रामपंचायत कडून माझ्या जागेत समाज मंदिर, आणि कचरा टाकण्यासाठीच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. माझ्या परवानगीशिवाय माझ्या जागेत काम करू नये असे सांगत असतानाही ठेकेदार आणि ठेकेदाराला मदत करणारे खारपाडा गावातील काही लोक दमदाटी करून टाकीच्या कामाचे खोदकाम करीत असल्याचे पांडुरंग गणपत सवार यांनी सांगितले, असून याबाबत संबंधितांविरोधात खटला दाखल करनार असल्याचेही पांडुरंग सवार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here