नागपूर ‘शिक्षक’ मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी

54

नागपूर ‘शिक्षक’ मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 

मो:8830857351

नागपूर, ३ फेब्रुवारी: नागपूर शिक्षक मतदार संघातून चंद्रपूरचे सुपुत्र महाविकास आघाडी समर्थित विमाशिसंचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजयावर नाव कोरले.

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा तब्बल सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

 २०१७ पासूनचे आमदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. अडबाले यांच्या रूपाने या मतदारसंघाच्या इतिहासात चंद्रपूरचे नाव प्रथमच कोरले गेले. जे शिक्षक अडबालेंना मनातून आमदार मानत होते त्यांना निकालाने हक्काचा आमदार मिळाला आहे. हा विजय शिक्षकांसह चंद्रपूरच्या राजकारणाचा नवा अध्याय आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार विमाशि संघाचाच दबदबा राहिला आहे. कारण विमाशि हा नागपूर व अमरावती विभागात शिक्षकांचा सर्वात मोठा संघ आहे.

१९९३, १९९८ व २००४ अशी तीन टर्म व्ही. यू. डायगव्हाणे या संघाच्या जोरावर शिक्षक आमदार होते. आता विमाशिने नवा चेहरा द्यावा, अशी धुसफूस सुरू झाली. मात्र, डायगव्हाणे माघारीला तयार नव्हते. परिणामी २०१० मध्ये विमाशित फूट पडली. डायगव्हाणे पुन्हा रिंगणात उतरल्याने चंद्रपुरातून लक्ष्मण बोढाले यांनी बंडखोरी केली. याचा थेट फायदा मराशिपचे नागो गाणारांना झाला आणि ते निवडून आले.

२०१७ मध्ये विमाशिने अडबाले यांच्या रूपाने चंद्रपूरला उमेदवारी द्यावी, असा सूर विमाशित होता. परंतु, अडबालेंना डावलून नागपूरचे आनंद कारेमोरेंना उमेदवारी दिली. अनेकांनी अडबालेंना बंडखोरीचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी विमाशिशी एकनिष्ठ राहुन कारेमोरेंसाठी मते मागितली. मात्र, कारेमोरेंवर ‘डमी’चा शिक्का लागला. विमाशिची मते फुटली. मराशिपचे गाणार दुसऱ्यांदा जिंकले. सर्वाधिक सदस्यसंख्या असतानाही बहुपसंतीचा उमेदवाराअभावी झालेला पराभव विमाशिच्या जिव्हारी लागला. तेव्हापासूनच विमाशिसह अनेक शिक्षक अडबाले यांना मनातून आमदार मानायला लागले. अडबाले यांनीही सात वर्षात शिक्षकांसाठी लढा देत ही नाळ घट्ट केली. अखेर हा दिवस उजाडला. शिक्षकांनी या निकालातून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत अडबाले यांच्या गळ्यात मतातून आमदारकीची माळ घातली.