कर्जफेडण्यासाठी शाखा व्यवस्थापकाने रचला मुथ्थूट फिनकॉर्प दरोड्याचा प्लान.

चोरट्यांकडून दोन किलो 556 ग्रॅम सोने किमत 1 कोटी 15 लाख 4 हजार 250 रुपये, रोख 99 हजार 120, सील स्कूल बॅग, दोन कार असा एकूण 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वर्धा :- येथील मुथूट फिनकॉर्पवर भरदिवसा पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीनंतर अवघ्या सहा तासांत चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागला. आरोपींना अटक करून पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल जप्त केला. दरोड्याचा मस्टरमाइंड मुथूट फिनकॉर्पच्या  शाखा व्यवस्थापक आहे. त्याने मित्राच्या मदतीने असलेले कर्ज फेडण्यासाठी दरोड्याची योजना आखल्याचे तपासात पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश अजाबराव श्रीरंग वय 35, रा. उमरेड, जि. नागपूर असे मास्टर माइंड शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. कुशल सरदारा आगासे वय 32, मनीष श्रीरंग घोळवे वय 35, जीवन बबन गिरडकर वय 36 आणि कुणाल धर्मपाल शिंदे वय 36 सर्व रा. यवतमाळ अशी अन्य आरोपींची नावे आहेत. दरोड्यात कुरिअर बॉय बनून आलेल्या व्यक्तीने चाकू आणि पिस्टलचा वापर केला होता. कुरिअर बॉयची भूमिका कुशल आगासे याने पार पाडल्याचे तपासा पुढे आले आहे.

चोरट्यांकडून दोन किलो 556 ग्रॅम सोने किमत 1 कोटी 15 लाख 4 हजार 250 रुपये, रोख 99 हजार 120, सील स्कूल बॅग, दोन कार असा एकूण 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांकडून आणखी मुद्देमाल जप्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटक केलेल्यांवर यापूर्वी कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास येथील मुथूट फिनकॉर्पवर दरोड पडला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. कर्मचाऱ्यांना विचारणा करताना व्यवस्थापकाच्या बोलण्यात पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पोलिसी हिसका दाखविला.

यावेळी त्याने पोलिसांसमोर सर्वच सत्याचा उलगडा केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इतर साथीदारांना यवतमाळ जिल्ह्यातील करळगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीतील साहित्य, दुचाकी आणि दोन कार असे साहित्य जप्त केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माखनीकर, वर्धेचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम  कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, संतोष दरगुडे, अनिल कांबळे, प्रमोद पिसे, राजेश जयसिंगपूरे, पवन पन्नासे, संघसेन कांबळे, विकास अवचट, अभिजित वाघमारे, चालक भूषण पुरी यांनी केली.  विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रासाद यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन केले.

कर्ज फेडण्यासाठी दरोड्याची योजना

मास्टर माइंड महेश श्रीरंग आणि इतर आरोपी हे बालपणीचे मित्र आहेत. महेशचे बालपण यवतमाळातच गेल्याने त्याने खास मित्रांच्या सहायाने ही योजना आखली. तिघांनी काही व्यवसाय सुरू केले होते. या व्यवसायातून निर्माण झालेल्या कर्जापोटी त्यांनी ही चोरीची योजना आखल्याचे पोलिसांच्या तपासा पुढे आले आहे. यात आणखी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

 पोलिसांना पारितोषिक

चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून काही तासाचाच कालावधी घेण्यात आला. भरदिवसा झालेल्या या दरोड्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी 6 तासाचाही कालावधी घेतला नाही. यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना 35 हजार रुपयांचे पारितोषिक देणार असल्याची घोषणा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here