बॉर्डर – गावसकर ट्रॉफीवर भारताचा वरचष्मा

61

बॉर्डर – गावसकर ट्रॉफीवर भारताचा वरचष्मा

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

इंग्लंड ऑस्ट्रेलिया या दोन देशात दरवर्षी एशेस नावाची कसोटी मालिका खेळवली जाते. क्रिकेट विश्वातील ही एक महत्वाची मालिका समजली जाते मात्र गेल्या दोन दशकात एशेस मालिकेपेक्षाही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात खेळली जाणारी बॉर्डर – गावसकर मालिकेला क्रिकेटप्रेमींची जास्त पसंती मिळाली आहे कारण ही मालिका एशेस पेक्षाही जास्त चुरशीने खेळली जाते. दोन्ही देशातील खेळाडू ही मालिका जिंकण्यासाठी जीवाचे रान करतात. ही मालिका म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारची मेजवानीच असते. याच मेजवानीचा आस्वाद क्रिकेटप्रेमींना आजपासून घेता येणार आहे.

बॉर्डर गावसकर मालिकेतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आजपासून ( ९ फेब्रुवारी ) नागपूर येथे होणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरवात १९९६ – १९९७ पासून झाली. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी आजवर १५ वेळा मालिका खेळवण्यात आली. १५ पैकी ९ वेळा भारताने ही मालिका जिंकून या मालिकेवर आपला वरचष्मा सिद्ध केला आहे तर ऑस्ट्रेलियाने ४ वेळा या मालिकेवर कबजा केला असून २ वेळा ही मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत आतापर्यंत ५२ कसोटी खेळल्या गेल्या आहेत त्यात भारताने २२ कसोटी तर ऑस्ट्रेलियाने १९ कसोटी जिंकल्या आहेत ११ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारताचा महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असून कर्णधार म्हणून त्याने १३ पैकी ८ कसोटी जिंकल्या असून स्टीव्ह वा आणि मायकल क्लर्क यांनी पाच कसोट्या जिंकल्या असून सौरव गांगुलीने तीन कसोटी सामने जिंकल्या आहेत. बॉर्डर गावसकर मालिकेत भारताने नेहमीच वरचष्मा गाजवला असून भारताने २०१४ – १५ मध्ये ही ट्रॉफी शेवटची गमावली होती तेंव्हापासून भारत या मालिकेत अपराजित आहे. २०२० – २१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.

घरच्या मैदानात एकदाच म्हणजे २००४ – ०५ मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. एकूणच या मालिकेत भारताने वरचष्मा गाजवला असून आताही भारतच या मालिकेवर कब्जा करेल असा विश्वास क्रिकेटप्रेमींना आहे कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि फॉर्मात असलेला शुभमन गिल या सलामीवीरांनी चांगली सुरवात करून दिली तर भारताचे निम्मे काम झाल्यात जमा आहे कारण त्यानंतर येणारे पुजारा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे मधल्या फळीतील खेळाडू फॉर्मात आहेत.

यष्टीरक्षक ईशान किशन हा ऋषभ पंतची उणीव भासू देणार नाही. गोलंदाजीतही भारताचे फिरकी गोलंदाज अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल हे ऑस्ट्रेलियन फलंदाजीला खिंडार पाडतील यात शंका नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जेरीस आणतील अर्थात ऑस्ट्रेलिया देखील सहजासहजी हार मानणार नाही म्हणूनच ही मालिका चुरशीची होईल मात्र शेवटी विजयी भारताचाच होईल.