हर हर महादेव; अवघे गरजे मार्कण्डादेव!
महाशिवरात्री: मार्कण्डादेव जत्रा विशेष
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे
मो. न: ७७७५०४१०८६
१९ फेब्रुवारी, गडचिरोली
यंदा कोरोना विषाणूने पड खाल्ली असल्याने महामृत्युंजय महामंडलेश्वर श्री मार्कण्डेश्वर जयंती उत्सवानिमित्त भरणाऱ्या मार्कण्डादेव येथील जत्रेला भाविकांची तुफान गर्दी उसळण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीची चाहुल लागली, की भावीक भक्तांच्या उत्साहास कमालीचे उधान येते. गडचिरोली जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यासह भारतभर महाशिवरात्रीला जत्रा मोठ्या प्रमाणात भरतात. या जत्रेच्या माध्यमातून अध्यात्मासह पर्यटनही साध्य होत असते. यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कण्डादेव यासह चामोर्शी तालुक्यातील चपराळा, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगम व तालुकानजीकचे कालेश्वर, आरमोरी तालुक्यातील वैरागडचे भंडारेश्वर मंदीर, स्थानिक डोंगरी महादेवगड, ठाणेगावचे हेमांडपंथी मंदीर, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडीचे महादेवगड यासह अनेक ठिकाणी जत्रा भरत असतात.
मागील दोन वर्षी कोरोनाचा जिवघेणा अकांडतांडव सुरू असल्याने कडक निर्बंध लावले गेले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वच जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा भाविकांना जत्रास्थळी “हर हर महादेव” असा जयघोष करत जाण्याची संधी मिळाली आहे. महामंडलेश्वर महामृत्युंजय श्री मार्कण्डेश्वर हे अख्ख्या भारतवर्षातील पद्मशाली समाजाचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कण्डादेव येथे मार्कण्डेश्वराचे मंदिर आहे. त्याची विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर ख्याती आहे. माघ शुद्ध तृतीयेला महामृत्युंजय मार्कण्डेय महर्षींची जयंती असते. या दिवशी जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर महाशिवरात्रीला मार्कण्डादेव येथे खुप मोठी जत्रा भरते.
महामंडलेश्वर महामृत्युंजय श्री मार्कण्डेश्वर पुराण: हे पुराण महादेवाचा लाडका भक्त- महर्षी मार्कण्डेयांनी स्वतः कथन केल्यामुळे या पुराणाला मार्कण्डेश्वर पुराण हे नाव मिळाले आहे. प्रदीर्घ तप:सामर्थ्याने चिरंजिवीत्व मिळविलेले ऋषी म्हणजे महर्षी मार्कण्डेय होत. श्रीमहाभारत संस्करणाच्या बाबतीत महत्वाच्या असलेल्या भार्गव ऋषींच्या वंशातील हे ऋषीराज महर्षी होते. हे पुराण प्राचीन असून याचा काळ साधारणतः इसवी सनाचे तिसरे शतक असावे, असे सांगितले जाते. गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुराण त्याकाळी म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकात गोदावरीच्या उगमावर लिहिले गेले असावे. त्यात सर्ग- जगाची निर्मिती, प्रतिसर्ग- प्रलय, वंश- राजवंश, मन्वंतरे- विशिष्ट कालखंड व वंशानुचरीत ही पुराणाची पाचही लक्षणे दिसून येतात. त्यात १३७ अध्याय असून सुमारे ६,९०० श्लोक आहेत. या पुराणात एकच एक वक्ता नाही, तर अध्याय क्र.१ ते ४२पर्यंत वक्ता जैमिनी व श्रोता पक्षी आहे. अध्याय क्र.४३ ते ९०पर्यंत वक्ता मार्कण्डेय ऋषी व श्रोता क्रप्टुकी आहे आणि नंतरच्या अध्यायांमध्ये वक्ता सुमेधा व श्रोता सुरथ व समाधी आहेत.
अठरा पुराणात सातव्या स्थानी असलेल्या या पुराणाच्या शेवटी मार्कण्डेय ऋषींनी पुराण श्रवणाचे फळ सांगितलेले आहेत. या पुराणाचे जो श्रवण करतो त्याची पृथ्वीवरील वंशपरंपरा चालत राहाते. त्या मनुष्याची पापांपासून मुक्ती होते, परम योगाची प्राप्ती होते. त्यास हजार अश्वमेध व शंभर राजसूय यज्ञाचे फळ मिळते. सर्वकल्याण व शुभार्थ प्रभावशाली मानला जातो तो श्रीमार्कण्डेश्वर पुराणाचा मंत्र- सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके| शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते|| सर्वबाधा विनिर्मुक्तो धन-धान्य सुतान्वितः|| (हे मोक्षा, आम्हास स्वतंत्र कर, मुक्ती दे. आम्ही भगवान शिवाची पूजा करतो, ज्यास तीन नेत्र आहेत. जो हर श्वासात जीवन शक्तीचा संचार करतो आणि संपूर्ण जगाचे पालन- पोषण करतो. रोज रुद्राक्षमाळेने या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते. तो सर्व संकटातून मुक्तता करणारा, संपत्ती व संततीचा दाता आहे.)
प्रकृती अर्थात नारी स्वरुपिणी देवी हीच विश्वाची प्रेरकशक्ती आहे, हा मूळ हेतू या पुराणाचा आहे. दुर्गासप्तशती या नावाने प्रसिद्ध असलेले देवीमहात्म्य या पुराणाच्या तेराव्या अध्यायात आलेले आहे. सर्वमंगला अशा देवीची निर्मिती ही सर्व देवींची निर्मिती ही सर्व देवांचे तेजस्वी अंश एकत्र होऊन झाली, असेही वर्णन आहे. हा श्रीमार्कण्डेय पुराणाचा अंश आहे. तो देवी महात्म्य धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांना प्रदान करण्यास सक्षम आहे. सप्तशतीमध्ये काही असेही स्तोत्र व मंत्र आहेत, जे विधिवत पारायणाने इच्छित मनोकामनांची पूर्ती करतात, असे म्हटले जाते.
महामंडलेश्वर मार्कण्डेय महर्षींची कथा: काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परमभक्त महर्षी मार्कण्डेयांना दीर्घायुषी झाल्याचे म्हटले आहे. भगवान शि़वाची उपासना व महामृत्युंजय सिद्धीने महर्षी मार्कण्डेयांनी सोळा वर्षाच्या अल्पायुषावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले. तो भगवान शंकरजींचा सर्वार्थ साधक मंत्र असा- श्री नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिवकाराय नमः शिवाय:|| अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम्|| अकालमृत्योः परिरक्षणार्थ वन्दे महाकाल महासुरेशम्|| मात्र सर्व परिचित सप्त चिरंजीवांमध्ये मार्कण्डेयांचा समावेश नाही, हीच खंत भक्तांच्या नाजूक साजूक मनांना बोचत असते. महर्षी भृगू यांची कुलपरंपरा फार मोठी आणि कर्तृत्ववान वंशजांनी युक्त असली तरी त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते त्यांचे पणतू महर्षी मार्कण्डेय यांचे! भृगूंचे नातू मृकूंड यांना मोठ्या तपश्चर्येनंतर भगवान शंकराच्या प्रसादाने झालेला हा मुलगा दिगंत कीर्तिमंत ठरला. तेजस्वी व कर्तृत्ववान मुलगा हवा असेल तर तो केवळ सोळा वर्षेच जगणारा मिळू शकेल, असे भगवान शंकराने वर देताना म्हटले. तेव्हा मृकूंड व पत्नी मरुध्वती हिने मोठ्या आनंदाने तो मुलगा मागून घेतला. मात्र पुढे या बाल मार्कण्डेयांनी तपोबलाने, वशिष्ठ मुनी व ब्रह्मदेवाच्या कृपेने मृत्यूवर मात केली. त्यांनी दीर्घायुष्य प्राप्त केले व ते मृत्युंजय ठरले, अशी पुराणात कथा आहे. चिरंजीव झालेल्या मार्कण्डेयांचे सर्व विषयांवरील ज्ञान आणि संशोधन विलक्षण आहे. याशिवाय प्रसंगानुरुप त्यांनी मृत्युंजयस्तोत्र रचले. तो महामृत्युंजय मंत्र असा- ॐ हौं जूं सः ॐ भूर्भूवः स्वः ओम त्रैम्बकम् यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम्|| उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् भूर्भुवः स्वरोम जूं सः||
देवीचा ध्यान मंत्र: देवी प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य| प्रसीद विश्वेतरि पाहि विश्वं त्वमीश्चरी देवी चराचरस्य|| अग्नी, सूर्य यांचीही स्तोत्रे यात दिसून येतात. प्रभू रामचंद्राची कथा, भगवान श्रीकृष्णाचे बालचरित्र अशी इतर आख्यानेही यात आहेत. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेले मार्कण्डादेव हे शिव-तीर्थ व तेथून जवळच असलेल्या आमगाव (महाल) येथील दोन श्रीमार्कण्डेश्वर मंदिरे अजुनही दुर्लक्षितच आहेत. भारतीय पौराणिक साहित्यांमध्ये जी अठरा पुराणे आहेत, त्यात एक अतिशय महत्वाचे असे श्रीमार्कण्डेश्वर पुराण देखील आहे. या महर्षींचे राष्ट्रीय पौराणिक महत्त्व विषद करण्यासाठी याहून अन्य सबळ दाखल्यांची गरजच काय? म्हणूनच भारत सरकारनेसुद्धा या मंदिराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. या पुराणात सगळ्या प्रकारच्या अवतारकथा येतात. म्हणूनच महाशिवरात्रीला मार्कणडादेव येथे खुप मोठी जत्रा भरते. तेथे महाकाल शिवदर्शनासाठी मोठी गर्दी उसळत असते. मागील दोन वर्षी जत्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाली होती. मात्र यंदा ती भाविकांच्या अतिउत्साहात आणि अलोट गर्दीत फुलून येणार आहे, हे निश्चित! !! महामृत्युंजय महामंडलेश्वर श्रीमार्कण्डेश्वराय नमोऽनमा !!
!! मीडिया वार्ता परिवारातर्फे महाशिवरात्रीच्या सर्व भावीक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!