मीडियावार्ता आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा २०२३ माणगाव मध्ये दिमाखात संपन्न

59

मीडियावार्ता आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा २०२३ माणगावमध्ये दिमाखात संपन्न

मीडियावार्ता

१९ फेब्रुवारी, माणगाव: शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रायगडच्या पावन भूमीत विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या समाजसेवकांचा गौरव करणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२३ वितरण सोहळा दिमाखात पार पडला. मीडियावार्ता आयोजित या सोहळ्याला मा. आदितीताई तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार विजेत्यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

मा. आदितीताई तटकरे यांनी आपल्या भाषणातून तमाम जनतेला महाशिवरात्री आणि शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पुरस्कार प्राप्त समाजसेवकांचे अभिनंदन करून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये करत असलेले त्यांचे कार्य अविरतपणे चालू ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. मीडियावार्ताचे संस्थापक श्री. भागुराम सावंत यांनी तरुण, तडफदार, अभ्यासू महिला नेत्या म्हणून नावलौकिक असणाऱ्या आदितीताई तटकरे यांचा “लोकसेवा पुरस्कार २०२३” प्रदान करून सन्मान केला.

सदर कार्यक्रमास माणगावसह विदर्भ, कोकण, मराठवाडा, मुंबई विभागातून शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यावसायिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेवून शिवज्योत किल्ले रायगडावरून माणगावमध्ये दाखल

कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात मीडियावार्ताचे रायगड ब्यूरो चीफ श्री. सचिन पवार यांच्या स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अफाट प्रेम आणि आदर असणारे स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुपच्या शेकडो शिवमावळ्यांनी किल्ले रायगडवर शिवाजी महाराजांच्या समाधीवर दर्शन घेवून शिवज्योती प्रज्वलित केली. मोठ्या उत्साहाने ” छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशी घोषणा देत किल्ले रायगड वरून शिवज्योत, महाड शिवाजी चौकाला भेट देऊन सकाळी माणगाव मध्ये दाखल झाली.

माणगाव शहरामध्ये बालाजी कॉम्प्लेक्स ते अशोक दादा साबळे विद्यालय यादरम्यान ढोल ताशांच्या गजरात शिवज्योत रॅली काढण्यात आली. मीडियावार्ता आणि स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप यांनी सलंग्नपणे यावर्षीचा शिवजन्मोउत्सवाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पाडला. यामुळे माणगावमध्ये एक नवं चैतन्याचे वातावरण पाहवयास मिळाले आणि जनतेने कार्यक्रमात सहभागी होऊन शिवरायांप्रती आपला आदर व्यक्त केला.