भारतीय विज्ञान दिन विशेष: वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मानव कल्याण शक्य!

75

भारतीय विज्ञान दिन विशेष: वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मानव कल्याण शक्य!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे

मो: ७७७५०४१०८६

२८ फेब्रुवारी, गडचिरोली

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे तसेच सामान्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिन पाळला जातो. देशभरात हाच एक मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी २८फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 

      आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो. महान वैज्ञानिक भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थामधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल होतो. हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना सन १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नाही तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ सन १९८६पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होऊ लागला. सन १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला.

     वैज्ञानिक दृष्टीकोन हा शब्द हल्ली वाक्प्रचारासारखा वापरला जातो, असे मला वाटते. आपल्याला न पटलेल्या बोलावर हा शब्द एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. वैज्ञानिक दृष्टीकोन हे वाक्य आपल्या देशात मुख्यत: विज्ञानाशी संबंधीत गोष्टींशी, म्हणजे जे आपण बेसीक विज्ञान समजतो त्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन शाखांशी मर्यादीत असतो, असा आपला सर्वसाधारण समज आहे. रोजच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे, मग ती कोणतीही साधी गोष्ट असो. जसे- मुंबईत बीएसटीच्या बसमधून पुढच्या दरवाजाने का उतरावे? एसटी बसच्या कंडक्टरची सीट डावीकडे दरवाजापाशी का असते? किंवा कोणताही कुत्रा धावताना तिरकस का धावतो? यात विज्ञान आहे. विषय कोणताही असो, मात्र, असं का? हा प्रश्न स्वत:ला पडणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, असे मला वाटते. कोणी दिवा विझल्यास अंधारात जेवत नाही, मरणघरी सव्वा महिनापर्यंत तर तेरवी व बारसे कार्यक्रमातील अन्न सेवत नाही. अन्नच ते, मग सेवन केले तर काय होते? याचा पडताळा घेतला पाहिजे. आपण अंधश्रद्धा या लेबलखाली अनेक गोष्टींवर विचार करायचे टाळतो, कारण तसे करणे म्हणजे स्वतःची बुद्धी गहाण ठेवणे होय. आपल्या देशात अंधश्रद्धा असे नांव दिले, की मग त्यावरची चर्चा टाळली नव्हे, तर मारली जाते. आपल्या प्राचीन प्रथा-परंपरा, दैवते यांचेही असेच आहे. त्यामागे निश्चित असा कार्यकारण भाव आहे आणि आपल्या पूर्वजांनी त्याकाळच्या जनमानसाला झेपेल अशा भाषेत तो सांगीतला आहे. यावर आधुनिक युगात विशेष संशोधन व्हायला हवे. शेवटी विज्ञान या शब्दाचा सामान्य अर्थ विशेष ज्ञान असा होतो. आपल्या या प्रथा-परंपरा किंवा दैवते यावर विशेष ज्ञान मिळवण्याचा फारसा प्रयत्न आपल्याकडे होत नाही. त्यावर सरळ अंधश्र्द्धा म्हणून शिक्का मारला गेला. त्यांचा आता अभ्यास करताना तो त्या काळात जाऊन करावा व आधुनिक काळात त्याचा अर्थ काय? हे उलगडून सांगणे म्हणजे विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन होय. यासाठी दैवतांना पुजताना आणि प्रथा पाळताना, दैवते म्हणजे काय? आणि प्रथा का पाळावी? हे प्रश्न आपल्याला पडणे, त्यांची उत्तरे शोधणे आणि त्यातील पटलेल्या गोष्टी घेऊन न पटलेल्या गोष्टींचा त्याग करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, असे मला तरी वाटते.

     चंद्रशेखर वेंकटरामन हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म दि.७ नोव्हेंबर १८८८ रोजी तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडीलाचे नाव चंद्रशेखर अय्यर तर आईचे नाव पार्वती होते. त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. सन १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. त्यांचे दि.६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मलबरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. ऑक्टोबर १९७०च्या शेवटी ते त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले; त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली. ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला, कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले. डॉ.सी.व्ही.रामन यांचा नैसर्गिक मृत्यू दि.२१ नोव्हेंबर १९७० रोजी ८२व्या वर्षी बंगळूर, कर्नाटक येथे झाला.

     भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे हे होय. डॉ.वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन नसावा. त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि त्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे, सर्व विषयांवर चर्चा करणे, विज्ञान क्षेत्रात विकास साधणे, नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे, देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे, लोकांना प्रोत्साहित करणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे, अशा आदींच्या पूर्ततेचा विचार या विशेष दिनामागे लपलेला आहे.

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनी आपल्या सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठसावा, यास्तव हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!