हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ विनोदी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. सतीश कौशिक हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले विनोदी अभिनेते होते. अनिल कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटात त्यांनी केलेली कॅलेंडर नावाची विनोदी भूमीका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जवळपास १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी केलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.
प्रेक्षकांना हसवण्यासाठी ते कधी कॅलेंडर बनले तर कधी पप्पू पेजर, कधी जर्मन बनून तर कधी कुंजबिहारी बनून त्यांनी प्रेक्षकांना हसवले. राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटात त्यांनी केलेल्या विनोदी भूमिकांसाठी त्यांनी फिल्मफेअरचा उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १३ जून १९५६ रोजी हरियाणातील एका खेडेगावात जन्मलेले सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी हिंदी चित्रपटात काम करायचा निश्चय केला त्यासाठी अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यावर ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर त्यांनी काही नाटकात भूमिका केल्या. शेखर कपूर यांच्या मासुम या चित्रपटात छोटी भूमिका करून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. याच चित्रपटात शेखर कपूर यांनी त्यांना आपले सहाय्यक दिगदर्शक बनवले. या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते. पुढे ते स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शन करू लागले. बोनी कपूर यांनी त्यांना त्यांच्या रूप की राणी चोरों का राजा या आपल्या बिग बजट चित्रपटासाठी दिग्दर्शनाची संधी दिली. सतीश कौशिक यांनी त्या संधीचे सोने केले आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख बनली. त्यांनी दिगदर्शीत केलेले तेरे नाम, हम आपके दिल मे रहते है, हमारा दिल आपके पास है, बधाई हो बधाई हे चित्रपट खूप गाजले. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. सतीश कौशिक यांनी हिंदी सोबतच मराठी चित्रपटाचीही निर्मिती केली हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी मन उधाण वाऱ्याचे या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
सतीश कौशिक हे असे अचानक निघून जातील असे कोणालाही वाटले नव्हते कारण जाण्याचे त्यांचे वय नव्हते त्यामुळेच त्यांच्या जाण्याने प्रेक्षक खूप हळहळले आहेत. सहाय्यक अभिनेते, विनोदी अभिनेते, निर्माते, दिगदर्शक अशा माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवलेल्या सतीश कौशिक यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. हरहुन्नरी कलाकार सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.