जी -२० समितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा वाढेल मानसन्मान 

रमेश कृष्णराव लांजेवार

माजी विद्यापीठ प्रतिनिधी

मो.नं.९९२१६९०७७९

पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात १९९७ साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जी २० समिती उदयास आली आणि ठरविण्यात आले की जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे हा मुख्य उद्देश बाळगुन जी २० अस्तित्वात आली. जी२० चे नेतृत्व २० देशातील  प्रत्येक देशांना दरवर्षी भुषवावे लागते.कारण यामुळे अनेक विषयांवर चर्चा करून आदानप्रदान होवून नवी दिशा मिळण्यास मदत होते एक नवीन ऊर्जा निर्माण होते.

२०२३ हे वर्ष भारतासाठी गौरव निर्माण करणारे ठरणार आहेत.कारण जी २० समितीचे अध्यक्ष भारताकडे असल्याने संपूर्ण भारतात जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येते.त्याच प्रमाणे जगात भारत शांतीचे प्रतीक असल्याने २० देशांसह संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे की यावेळेस भारत जगातील देशांसाठी नवीन ऊर्जा निर्माण करेल.जी २० च्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा व आदानप्रदान करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये २०० हुन अधिक बैठका होणार आहेत आणि या २०० ही शहराकडे जी २० देशांसह जगाचे लक्ष रहाणार आहे.कारण आर्थिकदृष्टया किंवा इतर समस्यांच्या बाबतीत भारताची प्रत्येक भुमिका नेहमीच जगावेगळी,रोखठोक व महत्वाची रहाली आहे आणि जगाने भारताच्या प्रत्येक भुमिकेचे स्वागतच केले आहे.त्यामुळे जगात भारत तिसऱ्या शक्तीच्या रूपात उदयास येत असल्याचे आपण पहातो.

जी२० ही जगातील वीस प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांची संघटना आहे.यामध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया,सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन संघांचा समावेश आहे.जगात जी२० देशाची मोठी भुमिका आहे.कारण जगाच्या एकूण जीडीपीच्या ८५ टक्के जीडीपी जी २० देशातुन येते, जागतिक व्यापारातील ७५ टक्क्यांहून अधिक व्यापार जी २० देशात एकवटला आहे, जगातील ६० टक्के लोकसंख्या जी २० देशांमध्ये आहे.त्यामुळे जी २० हळूहळू आर्थिकदृष्टया बळकट होतांना दिसत आहे. यावर्षीचे यजमान पद भारताला मिळाल्याने भारताने बांग्लादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर,स्पेन, आणि युएई या देशांना सुध्दा निमंत्रण दिले आहे.जी २० समितीच्या महाराष्ट्र एकुण १४ बैठकी होणार आहेत.मुंबईत ८ तर पुण्यात ४ तर नागपूर आणि औरंगाबाद येथे एक -एक बैठक होणार आहे.यात संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसेच काही देशाचे पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.यामुळे देशाची मान जगात उंचावेल.

जी २० देशांमध्ये भारत आर्थिकदृष्टया ५ व्या क्रमांकावर आहे म्हणजेच आज जागतिक दृष्ट्या भारत मजबूत स्थितीत आल्याचे दिसून येते.नागपूरमध्ये जी २० समितीची बैठक २१ आणि २२ मार्चला होणार आहे या बैठकीत ४० देशांचे १४० प्रतिनिधी प्रामुख्याने सहभागी होतील त्या अनुषंगाने संपूर्ण संत्रानगरी सुशोभित झाल्याचे दिसून येते.कारण जी २० च्या माध्यमातून नागपूर हे जगाचा केंद्रबिंदु बनु शकतो व जागतिक शहर म्हणून जी २० च्या माध्यमातून प्रसिद्धीस येवू शकते.तसे पहावे तर नागपूर हे पुर्वीपासूनच जग प्रसिद्ध आहे.कारण आपल्याला नागपूरात व नागपूरच्या आसपास नामांकित स्थळे पहायला मिळतात.ज्या ठिकाणी जगातील अनेक पर्यटक येतात दिक्षाभुमि,ताजुद्दीबाबाचा दर्गा ताजबाग, प्रसिद्ध गणेश टेकडी, दिक्षाभुमि,चर्च, गुरूद्वारा, कोराडी मंदिर,रमन सायन्स केंद्र, अशा अनेक प्रसिद्ध टीकान व वास्तुमुळे नागपूरला मोठी प्रसिद्धी प्राप्त झाली आहे.त्याचप्रमाणे नागपूरसह संपूर्ण विदर्भ संत्रा उत्पादनाचे माहेरघर आहे.त्यामुळे आज नागपूर हे संत्रानगरी म्हणून भारतासह जगप्रसिद्ध आहे. परंतु जी २० च्या माध्यमातून नागपूर जगाच्या केंद्रस्थानी रहावा या उद्देशाने कार्य सुरू आल्याचे दिसून येते.कारण विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि नागपूरच्या संत्र्याचा गोडवा जगभरात प्रसिद्ध आहे.नागपुरातुन जगातील अनेक देशांमध्ये संत्र्याची निर्यात केली जाते.त्याचप्रमाणे संत्र्यापासुन संत्रा बर्फी,संत्रा ज्युस इत्यादीसह वेगवेगळे पदार्थ संत्र्यापासुन बनवुन निर्यात केली जाते.त्याचप्रमाणे संत्रा आरोग्याच्या दृष्टीकोणातुन पाचक व शक्तीवर्धक आहे.त्यामुळेच नागपूरला संत्रा नगरीचा दर्जा प्राप्त झालेला आहे.ही ऊर्जा संपुर्ण जगभर पसरावी अशी नागपूर वासीयांची इच्छा आहे.

२० ही आंतरराष्ट्रीय बैठक आहे त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीवर आहे.भारताची वाटचाल अती वेगाने उंच भरारी घेत आहे ही बाब जी-२० च्या भारतात होत असलेल्या बैठकांवरून लक्षात येते.जी-२० ची बैठक भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.या बैठकीत २० देशांचे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहुन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून पुढील रूपरेषा ठरविण्यात येत आहे.भारतीय संस्कृती जी २० परिषदेला नवीन दिशा देवुन जगात शांतता प्रस्थापित अवश्य करेल अशी मला खात्री आहे.या लेखाच्या माध्यमातून जी २० देशांना विनंती करतो की रशिया-युक्रेन युध्दाला ताबडतोब पुर्णविराम लागावा या उद्देशाने सर्वांनीच पाउले उचलावीत व महायुध्दाच्या वाटेवरून जगाला बाहेर काढावे आणि जगात शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश सर्वांनीच ठेवला पाहिजे.कारण जी २० मध्ये अनेक बलाढ्य देश आहेत.त्यांचा एकच उद्देश असावा जगाचा विकास व शांतता यातच सर्वांचीच भलाई आहे.

त्याचप्रमाणे जी २० परिषदेचे औचित्य साधून विदेशातील येणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते ज्या-ज्या ठिकाणी बैठकी होणार आहे त्या संपूर्ण ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.यामुळे जगात एक चांगला संदेश जाईल व पर्यावरण सुधारण्यास मोठी चालना मिळेल.कारण जगाला निसर्ग वाचविण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here