कल्याण तीन दिवसात 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट

अस्मिता सकपाळ प्रतिनीधी

ठाणे :- कल्याणमध्ये एकाच परिसरात तीन दिवसात 11 ठिकाणी चोरीच्या घटना  घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत लवकरात लवकर चोरट्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत चोरी, घरफोडी, ज्वलेर्सवर दरोडा, सोनसाखळी चोरी या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या नांदीवली परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानात दुकान फोडून चोरी झाली होती. कल्याण पूर्वेत एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार झाले आहे. या सगळ्या घटना ताज्या असतानाच कल्याणच्या आडीवली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून 11 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहे.

धक्कादायक म्हणजे भरदिवसा या चोरीच्या घटना घडत आहेत. यापैकी फक्त शनिवारी रात्री चार ठिकाणी चोरी झाली. त्यात एका हॉटेलचा समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त नागरीकांनी स्थानिक माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आडीवली परिसरात पोलीस चौकी झाली पाहिजे. पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. सराईत गुन्हेगारांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. चोरट्यांना अटक केली पाहिजे, अशा मागण्या सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्याकडे केल्या.

या चोरिच्या घटनांनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली. मात्र चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here