नाटु नाटुला ऑस्करची दाद !

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

दक्षिणेसह संपूर्ण भारतात कमालीचा यशस्वी झालेला आणि संगीत क्षेत्रातील मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकलेला तेलगू भाषेतील आरआरआर या चित्रपटातील नाटु नाटु या गाण्याला प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाल्याने तमाम भारतीयांना आणि संगीतप्रेमींना कमालीचा आनंद झाला आहे. भारतासाठी यंदाची ऑस्करवारी फलदायी ठरली आहे. ९५ व्या अकॅडमी पुरस्कार वितरण सोहळ्यात सोमवारी नाटु नाटु या गाण्यासोबतच द एलिफंट व्हिसपर्स या लघु माहितीपटाला देखील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. एकाच वर्षी दोन ऑस्कर पुरस्कार पटकवण्याची भारताची ही पहिलाच क्षण आहे म्हणूनच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

ऑस्कर पुरस्कार हा कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. अमेरिकेच्या हॉलिवूडमध्ये ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच लघुपट, माहितीपटांना हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे मोशन पिक्चर गटातील बेस्ट ओरिजनल सॉंग ठरलेले नाटु नाटु हे पहिलेच भारतीय चित्रपटातील गाणे आहे. याआधी संगीतकार ए आर रहमान यांना स्लम डॉग मिलेनियम या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता. रिचर्ड अटेनबरा यांच्या गांधी चित्रपटलाही हा पुरस्कार मिळवला होता. त्याआधी सत्यजित रे यांना देखील ऑस्करने गौरवले होते.

नाटु नाटु ला हा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी बाब आहे कारण नाटु नाटु च्या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांची गाणी होती त्यांना मागे सारुन नाटु नाटु ने हा पुरस्कार मिळवणे ही बाब भारतीय चित्रपट सृष्टीची उमेद वाढवणारी आहे. आरआरआर या चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी १९२० मधील ब्रिटिश कालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी कोलाराम भीम आणि अल्लूरी सीताराम राजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट तिकीट बारीवर तुफान लोकप्रिय झाला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही हा चित्रपट हिट झाला आहे.

या चित्रपटाने आजवर १२०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. या चित्रपटाला रसिकांनी तर दाद दिलीच आहे आधी गोल्डन ग्लोब व आता ऑस्करने पुरस्काराची मोहर उमटवून तज्ज्ञांनी देखील हा चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचे मान्य केले आहे. ज्या नाटु नाटु या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला ते गाणे युक्रेनमध्ये चित्रित झाले. रशिया युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे नाटु नाटु हे गाणे युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात चित्रित झाले. युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात या गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी मिळणार नाही असे सुरवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शक एस राजमौळी आणि निर्माते संदीप रेड्डी वंगा यांना वाटले होते मात्र युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी दिली आणि आता या गाण्याने इतिहास घडवला.

हे गाणे सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट ठरल्यानेच ऑस्कर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी या गाण्याची निवड झाली आहे. प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळवून भारतीय चित्रपट सृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या आरआरआर च्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here