चंद्रपूरातील प्रदूषण नियंत्रणाकरिता कृती आराखडा प्रभावीपणे राबविणार, दीपक केसरकर यांची विधान परिषदेत ग्वाही
अश्विन गोडबोले
मो: 8830857351
मुंबई,15 मार्च: चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा तयार केला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. प्रदूषणासंदर्भात होणाऱ्या बैठकीप्रसंगी चंद्रपूरची बैठकही घेतली जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात होणाऱ्या बैठकीप्रसंगी चंद्रपूरची बैठकही घेतली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर शहर देशातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये चवथ्या क्रमांकावर आले असून, याचे महत्त्वाचे एक कारण कोळसा खाणी आहे. या कंपन्या धुळीची विल्हेवाट लावत नाहीत, पाणी शिंपडत नाही, प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात फुफ्फुसाशी निगडित आजारांची संख्या वाढत असल्याचा तारांकीत प्रश्न सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी उपस्थित केला.
याला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप होते. त्यामुळे बंदिस्त कंटेनरमधून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपूर शहराच्या लगत एमआयडीसी, सिमेंट कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्रांचा एकत्रित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय प्रदूषणावर उपाययोजना न करणाऱ्या कंपन्यांवर वेळोवेळी नियमानुसार कारवाई केली जात असते, त्यांचे डिपॉझित जप्त केले जाण्यासारखी कारवाई देखील आम्ही करीतच असतो.
शेतपिकांना नुकसान भरपाई देणार का : अडबाले
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी, वीज निर्मिती प्रकल्प, सिमेंट कारखाने, कोल वॉशरिज असे विविध उद्योग आहेत. त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत असते. या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासन देणार का, असा उपप्रश्न सदस्य, सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केला. त्यावर केसरकर म्हणाले, याबाबत चौकशी करून शासन स्तरावर योग्य ती पावले उचलली जातील.