शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचा पथनाट्याच्या माध्यमातून लोकजागर
विवेक काटोलकर
माणगांव शहर प्रतिनिधी
मो: 7798923192
माणगांव :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा माहिती कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तहसिलदार विजय तळेकर आणि तहसील कार्यालय, पनवेल यांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या रमाई आवास घरकुल योजना, स्टॅंड अप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना यांसह विविध योजनांची जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील पळस्पे, खांदा कॉलनी, विचुंबे, कुंडेवहाळ या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.
खांदा कॉलनी येथील कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता निवडणूक नायब तहसिलदार श्री.नाईक यांनी सहकार्य केले तसेच विचुंबे येथील कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रमोद शांताराम भिंगारकर, लेखनिक विनायक भोईर यांनी परिश्रम घेतले. कुंडे वहाळ येथील कार्यक्रमासाठी सरपंच सदाशिव वास्कर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी सहकार्य केले. या कलापथकाचे नेतृत्व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी करीत असून कलाकार म्हणून विनोद नाईक, समृद्धी पाटील, श्रावणी पाटील, प्रज्वल मोहिरे, सांची म्हात्रे, श्रेया आपणकर, मानव थळे, मंजित पाटील आदी सहभागी झाले होते.