भक्तिभावाने देवासमोर तेवत ठेवलेल्या दिव्यानेच कुटुंबाचा केला घात.
सोलापूर :- भक्तीभावाने देवाची सेवा करणारे लोकं चोवीस तास देवासमोर दिवा तेवत ठेवतात. दरम्यान हे सर्व भक्तिभावाने आणि श्रद्धा म्हणून लोकं करत असतात. मात्र देवासमोर भक्तिभावाने तेवत ठेवलेल्या दिव्यानेच कुटुंबाचा घात केल्याचे समोर आले आहे. भर दुपारीच संसाराची राखरांगोळी झाली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान सदर घटना करमाळा तालुक्यात घडली आहे.
करमाळा तालुक्यातील आप्पा वायसे यांचे कुटुंब अतिशय धार्मिक आहे. सोमवार असल्याने वायसे पती पत्नीचा उपवास होता. सकाळी पूजा केल्यानंतर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळवली आणि घराला आग लागली असल्याचे समोर आले. शेतात काम करून दुपारी घरातील मंडळी परत आली असताना एका कोपऱ्यात घर पेटले. त्यादरम्यान आप्पा वायसे त्यांची पत्नी, वडील आणि दोन मुले घरात होती. एका कोपऱ्याला घर पेटलेले हे शेजारच्या लोकांनी पाहिले आणि ते शेजारी ओरडत आल्यावर त्यांनी वायसे कुटुंबातील लोकांना कोपऱ्याला घर पेटले असल्याचे सांगितले. आग लागल्याचे समजताच सर्वांनी घराबाहेर धाव घेतली.
दरम्यान आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिक आग विझवण्यासाठी धावले. मात्र वेगाने सुटलेल्या वाऱ्यामुळे आग जास्तच भडकली. आग लागल्यानंतर मौल्यवान सामान बाहेर काढायची धडपड सुरु असतानाच आग भडकली आणि सर्वांना बाहेर पळावे लागले. दरम्यान वाऱ्यामुळे आप्पा वायसे यांच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या भावाच्या घरालाही आग लागली आणि पाहता पाहता ही आग समोरच्या दोन एकर उसालाही लागली आणि दोन लाखाचा ऊसही भस्मसात केला.
महत्वाच्या कागदपत्रासह जमीन व इतर महत्वाची कागदपत्रेही यामध्ये जळून गेली
दरम्यान लागलेल्या आगीत अप्पा यांचा मोठा मुलगा मयूर आणि लहान मुलगा महेश या दोघांच्या महत्वाच्या कागदपत्रासह जमीन व इतर महत्वाची कागदपत्रेही यामध्ये जळून गेली आहेत. दरम्यान, मोठा मुलगा बीएससी केमेस्ट्री चे शिक्षण घेऊन एमपीएससी करीत होता. तर लहान मुलगा महेश याने नुकतीच झेरॉक्स कागदपत्रावर एमएससी बायोटेक्नोलॉजी साठी प्रवेश घेतला होता. दरम्यान दोन दिवसापूर्वी विकलेल्या उडीदाचे अडीच लाख रुपयेही जाळून गेले. दुर्दैवाने एवढ्या थंडीत आज या कुटुंबाला निवारा घ्यायलाही जागा उरलेली नाही. जळालेल्या घराकडे बघत बसलेल्या कुटुंबाला आता शेजारी वस्तीवर आसरा घ्यावा लागणार आहे.
तोडणीला आलेला दोन लाखाचा ऊस जळून गेला
दरम्यान या आगीत तोडणीला आलेला दोन लाखाचा ऊस जळून गेला आहे. देवावर श्रद्धा ठेवून जगणाऱ्या वायसे कुटुंबाचे घर मात्र त्याच घराच्या देवघरात असलेल्या दिव्याने जळाले हे धक्कादायक वास्तव वायसे कुटुंबही आता नाकारु शकत नाही.