आरटीओ अधिकाऱ्याला ‘ब्लॅकमेल’ करून २५ लाख रुपयांची वसुली करणाऱ्या दिलीप खोडे याला अटक
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर : आरटीओ अधिकाऱ्याला ‘ब्लॅकमेल’ करून २५ लाख रुपयांची वसुली करणाऱ्या दिलीप खोडे याला शनिवारी पोलीस कोठडी संपल्यामुळे एसीबीने पुन्हा न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात चंद्रशेखर भोयर याला इंदोर येथून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत एसीबीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
पोलीस चौकशीत भोयर हा लाचेच्या प्रकरणाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचा पाढा वाचत आहे. मात्र, एसीबीकडे त्याच्याविरुद्धही पुरेसे पुरावे आहेत. जर तो खोडेच्या कटात सामील नव्हता तर गुन्हा नोंद होताच फरार का झाला? हा प्रश्न आहे. सुत्रांनुसार, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते. तुरुंगात गेल्यानंतरही खोडेच्या अडचणी कमी होणार नाही. एसीबी त्याच्याविरुद्ध उत्पन्नाहून अधिक मालमत्तेचा गुन्हासुद्धा दाखल करण्याची तयारी करीत आहे.
त्याला अटक केल्यानंतर एसीबीने त्याच्या मालमत्तांची माहिती काढली असता ठाणेच्या हिरानंदानी मिडासमध्ये दोन कोटींची सदनिका असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याच्या कुटुंबाने १५ लाखांची रोकड शेजाऱ्याच्या घरी लपवली होती. खोडेजवळ ५ कोटींहून अधिकची मालमत्ता आहे. तो एमआयडीसीत तृतीय श्रेणी तंत्रज्ञ आहे. एका तंत्रज्ञाकडे इतकी मालमत्ता असल्यामुळे त्याच्या कमाईच्या साधनावर संशय निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांशी खोडेचे जवळचे संबंध आहेत. तो मंत्र्याचा ओएसडीही राहिला आहे. खोडे यांनी काँग्रेस आमदार वजाहत मिर्झाच्या नावावर वसुली केली होती. लवकरच एसीबीचे पथक त्यांनाही जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्याची शक्यता आहे.