सुदानमध्ये गृहयुद्ध; लष्कर आणि निमलष्करी दल आमने

57

सुदानमध्ये गृहयुद्ध; लष्कर आणि निमलष्करी दल आमने

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

सामने सुदान आफ्रिकेतील एक मागास राष्ट्र. अरब राष्ट्राच्या सीमेवरील अवघी चार कोटी लोकसंख्या असलेल्या या यादवी माजली आहे. यादवी नव्हे तर देशांतर्गत युद्धच या देशात सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर दल यांच्यात युद्ध सुरू असून या युद्धात २०० हुन अधिक जणांचा बळी गेला आहे. यात एका भारतीय नागरिकाचाही बळी गेला आहे. अर्थात या युद्धामागचे खरे कारण हे सत्ता संघर्ष आहे हे नव्याने सांगायला नको.

सत्तेसाठी सुदानचे लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकले असून सत्तेसाठी नागरिक आणि सैनिकांचा बळी जात आहे. वास्तविक सुदानला यादवी नवी नाही. सत्ताधारी आणि लष्कर, लष्कर आणि नागरिक यांच्यात तिथे नेहमीच छोट्या मोठ्या चकमकी चालू असतात. सध्या जे युद्ध चालू आहे त्याची पार्श्वभूमी आधी समजून घेऊ. २०१९ साली सुदानमध्ये राज्यक्रांती झाली. ओमर अली बशीर याची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. जनतेचा रोष लक्षात घेऊन लष्कराने थेट ओमर अली बशीर याला आव्हान दिले आणि त्याची सत्ता उलथवून टाकली. ओमर अली बशीर याची सत्ता गेल्याने तिथे लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. यावर्षी तिथे निवडणुकाही होणार होत्या.

सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्दुल फतेह बुऱ्हाण आणि रॅपिड सपोर्ट ग्रुप ( आर एस एफ ) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो आणि हंगामी सरकार यांच्यात तसा करारही झाला होता मात्र ऑक्टोबर २०२१ मध्ये बुऱ्हाण आणि दगालो यांनी हंगामी सरकार उलथवून लावले आणि लष्करशाहीची स्थापना केली. बुऱ्हाण हे देशाचे सर्वोच्च तर दगालो हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले. सत्ता हस्तगत केल्यानंतर बुऱ्हाण यांनी निमलष्करी दल लष्करात विलीन करण्याची प्रकिया सुरू केली आणि एका वर्षाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.

निमलष्करी दलाचे प्रमुख दगालो यांनी विलीनीकरणाला विरोध करत किमान दहा वर्ष तरी निमलष्करी दल लष्करात विलीन होणार नाही अशी भूमिका घेतली आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पडली. बुऱ्हाण आपले ऐकत नाही हे लक्षात येताच दगालो यांनी राजधानी जवळील मेरावे शहरात आपले सैन्य घुसवले. हे शहर सुदान मधील प्रमुख शहर आहे या शहरात निमलष्करी दल घुसल्याने लष्करप्रमुख बुऱ्हाण यांनीही राजधानी कातूनमध्ये लष्कराची जमवाजमव केली. दोन्ही सैन्य समोरमसोर आले आणि शनिवारी त्यांच्यात पहिली चकमक झडली. दोन्हीही सैन्याने माघार घेण्यास नकार दिल्याने चकमक वाढत गेली.

मागील आठ दिवसांपासून दोन्ही सैन्यात चकमकी घडत आहेत यात २०० हुन अधिक नागरिक मृत्यू पावले असून २ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या युद्धामुळे ५० लाख नागरिकांनी सुदान सोडले असून लाखो नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात हा रक्तरंजित सत्ता संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जाणार आहे असे एकूण चित्र आहे. त्यामुळे अनेक देशांनी दोन्ही गटांना युद्ध थांबवण्याची विनंती केली मात्र दोन्ही लष्कर प्रमुख आपल्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे हे गृहयुद्ध आणखी काही दिवस तरी चालेल असेच सध्याचे चित्र आहे.