कर्जबाजारीपणाच्या नैराश्यात शेतकरी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

54

कर्जबाजारीपणाच्या नैराश्यात शेतकरी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

माधवराव कऱ्हाळे 

सोयगाव दि.,२२ (प्रतिनिधी) शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या सोयगाव शहरातील एका तरुण शेतकऱ्याने शेतात काहीच उत्पन्न येत नसल्याने कर्जबाजारीपणाच्या नैराश्यात विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

तरुण शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन  मदत कार्य सुरू केल्यानंतर काही वेळानंतर मृतदेह शोधण्यात नागरिकांना यश आलं. सदर आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव संदिप रमेश पाटील  वय 40 रा.सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर असं आहे.

मयत संदिप पाटील याचे वडिल रमेश श्रीपत पाटील यांनी या संदर्भात सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये माहिती देत नोंद केली आहे. त्यात म्हटलं आहे की, संदिप रमेश पाटील वय हा शेती व्यवसाय करुन त्यावर त्याच्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते मात्र, शेतात काही एक उत्पन्न येत नसल्यानं संदिप पाटील कर्जबाजारी झाला होता त्यास घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रासले होते त्यामुळे तो कायम नैराश्यात राहत होता. शुक्रवार दि.21 रोजी शेतात चवळी पिकाची राखण करीत असताना संदीपने 4 वाजेच्या सुमारास वडिलांना अखाजी सणासाठी आंबे आणण्यास घरी जा म्हणुन सांगीतले व तो शेतातच थांबला सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेतला असता संदिप पाटीलचा मृतदेह शेजारील गट क्रमांक 97 मधील विहीरीत आढळून आल्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरितून बाहेर काढण्यात आला.

शनिवारी सकाळी 10:30 शव विच्छेदना नंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात येथिल स्मशान भूमीत संदिप पाटील याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडिल, लहान भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.पुढील तपास सोयगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सूरु आहे.