खास उन्हाळी सुट्टीनिमित्त…एका अनाथालयाला भेट

59

खास उन्हाळी सुट्टीनिमित्त…एका अनाथालयाला भेट

खास-उन्हाळी-

पूनम पाटगावे 

मुंबई प्रतिनिधी 

शाळकरी मुलांच्या, कॉलेजवयीन युवक – युवतींच्या परीक्षा संपल्या. काहींचे परीक्षांचे निकाल लागलेत व काहींचे बाकी आहेत. पालकवर्गही परीक्षा झाल्यानंतर निश्चिन्त होऊन या उन्हाळी सुट्टीनिमित्त खासकरून विविध सहलींचे आयोजन करतात. या उन्हाळी सुट्टीनिमित्त बरेचसे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत व मित्रमंडळीसोबत विविध पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स, उद्याने, देवस्थाने, पौराणिक वास्तू – शिल्प, गड – किल्ले यांसारख्या बऱ्याच ठिकाणी भेट देण्याचे आयोजन करतात. आणि आपल्याकडे असणाऱ्या उन्हाळी सुट्टीचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. काहीजण तर वर्षभराच्या धावपळीच्या जीवनातून या खास उन्हाळी सुट्टीनिमित्त कामावरून सुट्ट्या घेऊन आपापल्या गावी जाण्याचे ठरवतात. आणि गावी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत आपली सुट्टी मजेत घालवतात.

         पण काहींना मात्र या सुट्ट्याचा मनमुराद आनंद उपभोगता येत नाही. आपल्या समाजामध्ये आजूबाजूला विविध ठिकाणी अनाथालये आहेत. त्या अनाथालयातील वयोवृद्ध मंडळी, मुले यांच्या चेहऱ्यावर मात्र खास उन्हाळी सुट्टीनिमित्त असणारा विशेष असा आनंद दिसत नाहिये. कारण त्यांचे कुटुंब हे अनाथालयच आहे. या अनाथालयांना समाजातील विविध दानशूर मंडळी, संस्था त्यांना जमेल त्यापरीने मदत करून तेथील मंडळींचा आनंद द्विगुणित करत असतात. तसेच आपल्यापैकी काही मंडळी आपला व आपल्या परिवारातील व्यक्तींचा आणि मित्रमंडळींचा वाढदिवस मोठया थाटामाटात व उत्साहात साजरा करताना दिसतात. या वाढदिवसाच्या निमित्ताने ते मोठमोठ्या पार्टींचेदेखील आयोजन करून वाढदिवस साजरा करतात. या उन्हाळी सुट्टीत आपण सर्वजण मिळून वर्षातून एकदा आलेला आपला वाढदिवस आयुष्यात एकदा तरी या अनाथालयांतील मंडळीसोबत साजरा करावा. आणि आपल्या आयुष्यातील एखादा वाढदिवस हा आगळावेगळा साजरा केला गेला याची देखील आपल्याला जाण राहील व आपल्याला प्रेरित बगुन इतर व्यक्तीही आपले वाढदिवसाचे आयोजन आयुष्यात एकदातरी अनाथालयात करतील अशी अपेक्षा मी बाळगते. 

       चला तर मग, आता आपणही या खास उन्हाळी सुट्टीनिमित्त आपला एक दिवस समाजातील एका अनाथालायला भेट देऊन, आपल्याला जमेल तशी त्यांना मदत करून त्यांचा आनंद द्विगुणित करूया. आपल्या एका भेटीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, त्यांना झालेला आनंद हा आपल्याला नक्कीच पाहण्याजोगा असेल.