कोकणच्या निसर्गाचा बळी देणारा रिफायनरी प्रकल्प नकोच, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील नागरिकांचा जीवाची बाजी लावून प्रकल्पाला विरोध, पण शिंदे – फडणवीस करतंय कोकणवासियांवर दडपशाही, नागरिकांनी मांडल्या जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर आपल्या व्यथा..
बारसू सोलगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी फोनवरून जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या दडपशाहीच्या व्यथा
मीडिया वार्ता, २५ एप्रिल:बारसू सोलगाव पंचक्रोशीतील 100 टक्के नागरिकांनी त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरीला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी 3 महिन्यापूर्वी माझी भेट घेतली होती. त्या गावामधील जवळ जवळ 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक आहे. गावामधील 100 टक्के लोकांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे.
याच प्रकरणातून विरोधातील लोकांचे समर्थन करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. गावामधील 100 टक्के लोकांचा जर विरोध असेल आणि ग्रामपंचायतीने देखिल विरोधात ठराव केला असेल तर तो प्रकल्प तिथे होऊ देऊ नका असे कायद्यात म्हटले आहे. तरी देखिल जोरजबरदस्ती करून तो प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत ही जी माहिती बाहेर आली हे ती मोठी धक्कादायक आहे. स्थानिकांचाच हा प्रकल्प राबवायला विरोध आहे. त्यांची मागणी आहे की, त्या ठिकाणी उत्कृष्ट आयटी पार्कची निर्मिती करा. स्थानिकांना जे पाहिजे ते तिथे द्यायला हवं. त्यांच्या व्यथांचा सरकारने विचार करावा. 5000 लोक माळराणावर बसले आहेत हे कोकणचे आंदोलन आहे. कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे मोडीन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे . आंदोलन हलक्यात घेऊ नका, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे.तसेच संबंधित सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचे आश्वासन त्यांनी बारसू सोलगाव पंचक्रोशीतील नागरिकांना दिले आहे.