उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353 डी वरील ट्रकला अचानक लागली भीषण आग
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर.= उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353 डी वरील उमरेड नागपूर रस्त्यावर रविवार कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. चांपा गावाजवळील टोल नाका परिसरात रविवार सायंकाळी 6.40 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.
मिळालेला माहितीनुसार, ट्रक क्र. एमएच 40 बीजी 5871 हा 16 चाकी ट्रक डब्ल्यूसीएल उमरेड कोळसा खाणीतून 40 टन कोळसा भरून खापरखेडा नागपूर कंपनीकडे जात होता. उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353 डी चांपा टोल नाक्याच्या आवारात ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने चालकाने ट्रक टोल नाक्याचा आवारातच रस्त्याच्या कडेला उभा केला. ट्रकमधून धूर वाढत असल्याचे पाहून ट्रकमध्ये बसलेला चालक तात्काळ बाहेर पडला आणि काही वेळातच ट्रकने पेट घेतला.
ट्रकचालक दुर्योधन ठाकरे (रा. खापरखेडा, नागपूर) यांनी घटनेची माहिती चांपा टोल नाक्याच्या एसआय लकी चंद्रवंशी यांना दिली. एसआय लकी यांनी तत्काळ याची माहिती कुही पोलिसांचे एसएचओ नितेश डोर्लीकर यांना दिली. पाचगाव पोलिस चौकीचे पोलिस हवालदार चांगदेवकुथे, पोलिस हवालदार आशिष खंडाईत यांनी घटनेचा पंचनामा केला. उमरेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली आणि स्थितीवर नियंत्रण मिळविले.
सध्या नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, हवामान खात्याने शहरात हिट वेव्हचा इशारा दिला आहे. त्यामुळे गर्मीमुळे ही शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असा अंदाज लावण्यात येत आहे.