हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

70

हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो:९९२२५४६२९५

तरुण मुलांसोबत अश्लील चॅटिंग करून त्यांना जाळ्यात ओढणे आणि नंतर त्यांच्याकडून अश्लील कृत्ये करून घेणे ते करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे. ते व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या कडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणे असा धंदा सायबर माफियांनी काही दिवसांपासून अवलंबला आहे. सुंदर मुलींच्या जाळ्यात अडकून त्यांना हवे नको ते सर्व त्यांच्या स्वाधीन करण्याची चूक तरुण मुले करू शकतात कारण त्यांचे वय.गद्दे पंचविशीत माणूस अशा चुका करतो पण हीच चूक जर माणूस वयाच्या साठीत करत असेल तर त्याला काय म्हणावे? आणि ती चुक करणारी व्यक्ती जर डीआरडीओ सारख्या महत्वाच्या प्रकल्पावर काम करणारी शास्त्रज्ञ असेल तर ?

हो हे घडलंय डीआरडीओ या देशाचे संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या संस्थेत शास्त्रज्ञ असलेल्या डॉ प्रदीप कुरुलकर या व्यक्तीला पोलिसांनी पाकिस्तानला देशाच्या संरक्षणासंदर्भात गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशेष म्हणजे डॉ कुरुलकर हे डीआरडीओ संस्थेत मागील ३८ वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी डीआरडीओ च्या प्रमुख क्षेपणास्त्रांच्या प्रेक्षपक आणि ग्राउंड सिस्टीम च्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली आहे. मिशन शक्ती या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या प्रेक्षपकाची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. ब्राम्होस या क्षेपणास्त्र निर्मितीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांना निवृत्त होण्यासाठी अवघी सहा महिने उरली असताना हे प्रकरण घडकीस आले. गेल्या काही वर्षांपासून ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या महिलेच्या संपर्कात होते या महिलेने नाव बदलून त्यांच्याशी संपर्क केला. मैत्रीचे ( की प्रेमाचे ) नाटक करून त्यांच्याशी संपर्क वाढवला आणि त्यांच्याकडून देशाच्या संरक्षणासंदर्भात महत्वाची माहिती हस्तगत केली.

डॉ कुरुलकर हे पाकिस्तानच्या हनी ट्रॅप मध्ये अडकल्याने देशाच्या संरक्षणासाबदर्भातील अनेक महत्वाची आणि गुप्त माहिती पाकिस्तानपर्यंत पोहचली आहे त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. केंद्र सरकारनेही याची गांभीर्याने नोंद घेतल्याने त्यांना त्वरित अटक केली आहे. अर्थात हनी ट्रॅप मध्ये अडकून देशाशी गद्दारी करणारे कुरुलकर हे पहिले गृहस्थ नाहीत याआधीही बीएसएफ चा एक जवान, अरुण मारवाह नामक वायुदलातील एक अधिकारी हनी ट्रपमध्ये अडकला होता. शत्रूराष्ट्राच्या गोटात शिरून त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेणे यासाठी ललनांचा वापर करणे हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. सर्वच देश हे करतात मात्र आता माहिती तंत्रज्ञान युगात हे करणे अधिक सोपे झाले आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा महत्वाच्या पदावरील व्यक्तींना संपर्क साधने आता सहज शक्य आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेर महिलेनेही हेच केले आणि डॉ कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात अडकवले. आता डॉ कुरुलकर यांची पूर्ण चौकशी केली जाईल त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येईल पण देशाची संरक्षण विषयक गुप्त माहिती पाकिस्तानला मिळाली आहे त्यामुळे देशाच्या संरक्षणालाच मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळेच हनी ट्रॅप मध्ये अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्या डॉ कुरुलकर सारख्या गद्दारांना कठोर शिक्षा द्यायला हवी.