पाण्याची बचत : काळाची गरज
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
राज्यातील तापमानाचा पारा जसा वाढत चालला आहे तसा राज्यातील पाण्याचा साठाही आटत चालला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तर सोडाच पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाच्या झळा जास्त जाणवत आहे. मराठवाड्यात अनेक मोठ्या प्रकल्पात पाणी साठा संपत आला आहे. राज्यातील धरण साठ्यातही सरासरी तीस ते चाळीस टक्केच पाणी शिल्लक आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यातील पाणी साठा ६९ टक्के इतका होता तो आज ३५.२७ टक्क्यांवर आला आहे. राज्यभरातील धरणामधला सुमारे ३४ टक्के उपयुक्त साठा कमी झाला आहे त्यामुळे राज्यातील काही शहरांत तर दहा दिवसांतून एकदा पाणी सुटत आहे. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे काही गावात पंधरा दिवसातून एकदा टँकर येतो तर काही गावात महिन्यातून एकदा टँकर येतो. पाण्यासाठी दाही दिशा अशी लोकांची अवस्था झाली आहे. पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यातील अनेक तालुक्यात पाण्याची पातळी खालावली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांवर दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. मुकी जनावरे आणि पक्षांना देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने आणि स्कायमेटने वर्तवला असल्याने पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. शिवाय यावर्षी पावसाचे आगमन उशिरा होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे दुष्काळाचे संकट आणखी गडद होऊ शकते. हे संकट टाळायचे असेल तर आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन त्याच्या वाटपाचे नियोजन केले पाहिजे. पुण्या – मुंबई सारख्या मोठ्या शहरात आजही २४ तास पाणी पुरवठा केला जातो. २४ तास पाण्याची चंगळ असल्याने कदाचित त्यांना पाण्याचे महत्व माहीत नसेल. पुण्या – मुंबई सारख्या शहरातील काही बेजबाबदार घटक पुरेसे पाणी मिळाल्यानंतर पाण्याची नासाडी करताना दिसतात. नळ खुले सोडून पाणी वाया घालवीत असतात. या शहरातील अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होताना दिसते. त्यामुळे या भागातही आवशक्य तितकेच पाणी सोडायला हवे.
पुणे महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे त्यामुळे पुणेकरांना पाणी बचतीची सवय लागेल. मुंबई महानगरपालिकेनेही असा निर्णय घ्यायला हवा. लोकांनी पाणी जपून वापरायला हवे. भविष्यातील पाण्याचे संकट गांभीर्याने घेऊन पाण्याचा अपव्यय टाळला आणि काटकसरीने वापर केला तर पाऊस पडेपर्यंत वेळ निभावून नेता येईल. पाणी हेच जीवन आहे. थेंब न थेंब पाण्याची बचत केली पाहिजे. पाण्याची बचत करूनच आपण पाण्याची निर्मिती करू शकतो. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे.