बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या.

58

बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या.

अमरावती :- बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून संतापलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. ही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील कुंभारवाडा स्थित लुंबिनीनगरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.

पोलीस सूत्रानुसार, रितेश ऊर्फ बंटी संतोष बारसे 21, रा. पंचशीलनगर, अमरावती असे मृताचे नाव आहे. मृत युवक पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर चोरी, लुटमारीचे गुन्हे फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी १६ व १७ वर्षीय विधी संघर्षित बालकावर भादंविचे कलम 302, 34, सहकलम 4,25 आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. रितेश हा मजुरीचे काम करीत होता. त्याने यातील एका आरोपीच्या बहिणीची छेड काढली. त्यानंतर मित्राच्या सहकार्याने भावाने रितेशचा  काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी रितेश लुंबिनीनगरात एकटा उभा असताना दोन्ही आरोपींनी त्याच्यावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ स्थितीतील रितेशला पोलीस व नागरिकांनी इर्विन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले.  पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, एपीआय बिपीन इंगळे, डीबी स्कॉडचे एएसआय प्रकाश राठोड, सागर, भजगवरे, अनूप झगडे, दीपक सुंदरकर, सागर पंडित उपस्थित होते.