आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक संवर्गातील उमेदवारांना मिळाली स्थायी नियुक्ती
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
मुंबई,16 जून: राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक संवर्गातील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. या मागणीची दखल घेत शासनाच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरिक्षक संवर्गातील ११४ उमेदवारांना स्थायी नियुक्ती दिली देण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा २०२१ च्या परीक्षेतील दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग या संवर्गाच्या ११४ पदांसाठी २० ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल ०५ डिसेंबर २०२२ ला आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. यावेळी गुणवत्तेनुसार ११४ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली. या सर्व ११४ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी १३ जानेवारी २०२३ ला ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांच्या कार्यालय येथे हजर रहावे असे कळविण्यात आलेले होते, त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु 4 महिन्याचा कालावधी पूर्ण होऊनही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही.
शिफारस पत्र मिळाल्यापासून ३ महिन्यात नियुक्ती बाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. असा शासन निर्णय असतांनाही या उमेदवारांना नियुक्ती दिल्या गेली नाही. त्यामूळे सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्त करण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीची दखल घेत सर्व ११४ उमेदवारांना स्थानी नियुक्ती दिली आहे. याबदल आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. सोबतच उद्योग निरीक्षक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, डॉक्टरांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात यावी या केलेल्या मागणीचाही आ. जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.