पाकिस्तानचा पाय खोलात…

79

पाकिस्तानचा पाय खोलात…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

भारतासोबतच स्वतंत्र झालेला पाकिस्तान आज अगदी भिकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानच्या राजकारण्यांनी एक काश्मीर मिळवण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला मातीत घातले आहे. पाकिस्तानला काश्मीर तर मिळालाच नाही तो मात्र खड्ड्यात गेला आहे. आज पाकिस्तान हा जगातला सर्वात कंगाल देश बनला आहे. पाकिस्तानात लोकांना एकवेळेचे पुरेसे अन्न खायलाही मिळत नाही. महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईने पाकिस्तानी जनता मेटाकुटीला आली आहे. पाकिस्तान हा आशिया खंडातील सर्वात महागडा देश बनला आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू विकत घेणेही शक्य नाही. इम्रान खान यांचे सरकार गेल्यावर सत्तेत आलेल्या शहाबाज शरीफ सरकार तरी आपल्या जनतेला दिलासा देईल असे वाटत होते पण हे सरकार आल्यापासून आगीतून फुफाट्यात अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.

पाकिस्तानच्या सरकारने नुकतेच २०२३ – २०२४ चे देशाचे अंदाजपत्रक मांडले मात्र या अंदाजपत्रकात इम्रान खान यांनी जी चूक केली तिचीच पुनरावृत्ती शहाबाज शरीफ सरकारने केल्याने देशाची तिजोरी भरणे तर सोडाच पण देशाची पूर्वीपेक्षा अधिक दुरवस्था होणार हे स्पष्ट झाले. देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. पाकिस्तानने २०२३ – २४ साठी एकूण १४.४६ ट्रीलियन रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले गेले आहे पण महागाईला तोंड देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, याचा अर्थ बजेटमध्ये काहीच नाही. महागाई कमी करणे आणि डॉलरवर नियंत्रण ठेवावे यावर या अर्थसंकल्पात कोणताही उपाय सुचवण्यात आला नाही त्यामुळेच हा अर्थसंकल्प देशाला आणखी आर्थिक गर्तेत ढकलेल असेच तेथील अर्थतज्ज्ञ सांगत आहेत एकूणच पाकिस्तानचा पाय आणखी खोलात चालला आहे हे मात्र नक्की.

https://mediavartanews.com/2023/06/18/why-rich-are-people-leaving-india/9

पाकिस्तानात महागाईचा दर २९ टक्क्यांवर पोहचला आहे. महागाई कमी करणे, देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणे, उपासमारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देणे यासाठी कोणत्याही उपाययोजना नसलेल्या या अंदाजपत्रकात मात्र संरक्षक बजटमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. यावर्षी संरक्षक बजट १.८ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. मागील वेळेपेक्षा हे १५.४ टक्के अधिक आहे. याचाच अर्थ पाकिस्तानला जनतेच्या पोटापेक्षा युद्ध सामुग्री जास्त महत्वाची वाटत आहे. वास्तविक पाकिस्तानने संरक्षण बजट कितीही वाढवले तरी ते भारताचा मुकाबला करू शकत नाही हे सांगण्यास कोणा तज्ज्ञाची गरज नाही. युध्दापेक्षा जनतेला सुखी समाधानी ठेवणे हे अधिक महत्वाचे आहे हे पाकिस्तानला गेल्या पंच्याहत्तर वर्षात समजले नाही त्यामुळेच पाकिस्तानची आज ही अवस्था झाली आहे.

जनतेच्या कल्याणासाठी, देशाच्या विकासासाठी निधी खर्च करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या लष्करासाठी, अतिरेक्यांसाठी आपली तिजोरी रिकामी केली. जनतेच्या करातून गोळा होणारा पैसा त्यांनी लोकहितासाठी न वापरता अतिरेक्यांसाठी वापरला. अतिरेक्यांना संरक्षण साहित्य पुरवले. त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले. त्यांना स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली. पाकिस्तानच्या आजवरच्या सरकारने जनतेऐवजी अतिरेक्यांचा विचार केला त्यामुळे तिजोरीत पैसेच उरले नाहीत जनता उपासमारीने मरू लागली. नवीन आलेले शहाबाज शरीफ सरकार तरी यातून बोध घेईल असे वाटले होते मात्र त्यांनी देखील मागच्याच सरकारची री ओढली त्यामुळे पाकिस्तानचा पाय आणखी खोलात जाणार हे मात्र नक्की.