भद्रावती शहरात घरफोडी, अज्ञात चोरट्याने लांबविले 10 तोळे सोने व 80 हजार रोख

71

भद्रावती शहरात घरफोडी, अज्ञात चोरट्याने लांबविले 10 तोळे सोने व 80 हजार रोख

 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो: 8830857351

भद्रावती, 24 जून: बंद असलेले घर फोडून 10 तोळे सोने व 80 हजार रोख असा एकूण 7 लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 23 जून रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान भद्रावती शहरात उघडकीस आली.

भद्रावती येथील भोजवार्डातील रहिवासी सुधाकर कवासे हे 18 जून रोजी आपल्या परिवारासोबत पुणे येथे नातेवाईकाकडे गेले होते. त्यानंतर ते 23 जून रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परतले. घरात प्रवेश करताच त्यांना घराची खिडकी फोडलेली व घरातील कपाट खुले दिसले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. कपाटातील दागिने व रोख रकमेची चौकशी केली असता 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 80 हजार रोख असा एकूण 7 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. त्यामुळे लगेच भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी पाहणी केली. त्यानंतर चंद्रपूर येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पाऊस आला असल्याने श्वान पथकाला या अज्ञात चोरट्यांचा मार्ग काढता आला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.