लोककल्याणकारी राजे-राजर्षी शाहू महाराज
शिवश्री: सतिष उखर्डे टेंभूर्णीकर
प्रसिद्ध व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक
आपल्या राज्याची प्रजा सुखी-संपन्न व्हावी त्यांचे दैन्य,दारिद्र्य नष्ट व्हावे त्यांना आनंदाने,स्वाभिमानाने जगता यावे,मोफत शिक्षण मिळावे यासाठी आपलं आयुष्य वेचणारे कल्याणकारी राज्यकारभार करणारे यशवंत, किर्तीवंत,सामर्थ्यवंत,पुण्यवंत, नीतीवंत असे जाणते, लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली कोल्हापूर जिल्ह्यात झाला.
ते स्वतः मल्ल होते, कुस्तीपटू होते,आदर्श ज्ञानामृताचा अभिषेक त्यांनी या बहुजन समाजासाठी घातला. ते एक राजकीय अर्थशास्त्राचे जाणकार होते, गुणसंपन्न राजे होते अनेक देश-विदेशात त्यांनी भ्रमण केलेले होते आणि वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांच्या मनात नवविचारांची पहाट फुलली.!त्या सामाजिक जाणीव जागृतीतून सामाजिक न्यायाच्या बळकटीला सुरुवात केली. गाव तेथे शाळा असा एक नवा शिक्षण विचार त्यांनी मांडला.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,शेतकरी व कामगारांनी संघटित व्हावे, कारण गवताच्या काडीला नाही पण पेंडीला महत्त्व आहे त्याकाळात समाजात असणाऱ्या काही वाईट प्रथा, परंपरा त्यांनी बंद केल्या.मला राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर,पण मागासलेल्या अविकसित समाजाच्या सेवेचे व्रत मी सोडणार नाही,असे त्यांनी स्पष्ट सांगितले… त्यामुळेच ते जनतेचे जाणते राजे..लोकराजे झाले.!
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून उभ्या महाराष्ट्राला ज्ञानाच्या प्रकाशाने न्हाऊ घातले. ते खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टनच होते. नवसमाज निर्मितीसाठी प्रत्येकाला शिक्षण दिले गेले पाहिजे, प्रत्येकाला ज्ञानप्राप्तीचा अधिकार आहे. शैक्षणिक,सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे स्थापन केली.मोफत सक्तीच्या शिक्षणाची योजना आखून त्याची प्रखर अंमलबजावणी केली.दिगंबर जैन बोर्डिंग स्थापना,वीरशैव लिंगायत वस्तीगृह स्थापना,मुस्लिम बोर्डिंग,मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री.नामदेव पांचाळ ब्राह्मण वस्तीगृह,सत्यशोधक समाज शाळेला वर्षासन पाटील शाळेची स्थापना,इंडियन क्रिश्चन हॉस्टेल,रावबहादुर सबनीस प्रभू बोर्डिंग,श्री. शिवाजी मराठा सोसायटी, आर्य समाज गुरुकुल,वैश्य बोर्डिंग स्थापना,शाहू छत्रपती बोर्डिंग,ढोर-चांभार बोर्डिंग, शिवाजी वैदिक विद्यालय व वस्तीगृह,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग,माणगाव येथे झालेल्या महाराष्ट्रातील अस्पृश्य वर्गाच्या परिषदेचे ते प्रमुख वक्ते होते,सोमवंशी आरक्षण बोर्डिंग,श्री.देवांग बोर्डिंग,श्री.छत्रपती करवीर चौथे शिवाजी महाराज बोर्डिंग,वंजारी समाज वसतिगृह,चोखामेळा वस्तीगृह,छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग,अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे अध्यक्ष,सुतार बोर्डिंग,नाभिक विद्यार्थी वस्तीगृह,जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना,असे समाजकार्य करत असताना त्यांनी लोक जागृती घडवून आणली.अस्पृश्यांचा उद्धार केला, शिक्षणातून सर्वांचा उद्धार केला,आणि धर्माला सार्वकालिक सत्याचे स्वरूप देण्यासाठी उभी हयात खर्च केली म्हणून,त्यांना युगपुरुष म्हटले पाहिजे.!
राजर्षी शाहू महाराज स्वतःच एक विद्यापीठ होते, चालते-बोलते-फिरते विद्यापीठ! शिक्षणातून लोकहितार्थ पोटात कळवळा बाळगून अहोरात्र धडपडणारे एक मुलखावेगळे विद्यापीठ! सामान्य माणसाच्या जीवनात शिक्षणातून सुख-समृद्धी निर्माण करणारे एक जगावेगळे विद्यापीठ!बहुजन अस्पृश्य समाजाने शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करत राहावी असा विचार मनात धरून प्रयत्नशील राहणारे एक अभिनव विद्यापीठ होते.. सर्व जाती-धर्मासाठी या महाराष्ट्रासाठी शाहू महाराजांनी आपल्या जीवाचे रान केले,मागासवर्गीयांना आरक्षण मिळवून दिले म्हणून, त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात…डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी मदत केली म्हणून त्यांच्याद्वारे लिहिलेले संविधान आम्हाला मिळाले. असे समाजसेवेचे शैक्षणिक,सामाजिक कार्य करत असताना ६ मे १९२२ रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले..अशा या लोकराजाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.!कोटी- कोटी प्रणाम.!शिक्षणातून लोकमंगल भावनेच्या आराधनेला वाहिलेल्या या स्वयंस्फूर्त विद्यापीठाला त्रिवार मानाचा मुजरा.!
