…तर पुण्याचा बिहार होईल

79

…तर पुण्याचा बिहार होईल

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

राजगडाच्या पायथ्याशी झालेली दर्शना पवारच्या हत्येची घटना ताजी असतानाच सदाशिव पेठेत भर दिवसा युवतीचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार करण्याची घटना घडली . प्रसंगावधान राखून एका युवकाने कोयता हिसकावून घेतल्याने त्या युवतीचे प्राण वाचले. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने या दोन घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या दोन्ही घटना पुण्यासारख्या देशाच्या सांस्कृतिक राजधानीत आणि विद्येच्या माहेरघरात घडल्याने पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराची मान शरमेने खाली झुकली आहे. पुणे हे मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर समजले जात होते मात्र मागील काही वर्षापासून पुण्याची ही ओळख पुसली जात आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर समजले जाते. सर्व प्रकारचे उच्च शिक्षण देणाऱ्या सर्वोत्तम संस्था पुण्यात आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. शिवाय एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत त्यामुळे पुण्यात उच्च शिक्षणासाठी संपुर्ण देशातून विद्यार्थी येतात त्यात मुलींची संख्या लाक्षणिक असते. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत किमान चार ते पाच वर्षे लागतात. या चार पाच वर्षात या विद्यार्थ्यांचा मुक्काम पुण्यातच असतो. काही विद्यार्थी वसतिगृहात राहतात तर काही विद्यार्थी ग्रुप करून खाजगी खोली घेऊन भाडेतत्त्वावर राहतात. शिक्षणासाठी देशातील विविध भागांतील विद्यार्थी एकत्र येतात त्यांच्यात मैत्री होते कधी कधी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. कुटुंबापासून दूर असल्याने त्यांना कोणी हटकायलाही नसते. काही दिवस प्रेमात निघून गेल्यावर त्यांच्यात वाद निर्माण होतो मग दोघांचे ब्रेकअप होते मग त्यातूनच तू मेरी नही हो सकती तो किसीं की नहीं हो सकती या बॉलीवूडपटातील नायकाप्रमाणे मुले मुलींना त्रास देतात त्यातून मग अशा घटना घडतात.

पुण्यात घडलेल्या दोन्ही घटना या त्याच मानसिकतेतून घडल्या आहेत. हल्ला झालेल्या दोन्ही मुली या एमपीएससीच्या शिक्षण घेत होत्या दर्शना पवार तर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन वन खात्यात अधिकारी बनली होती. वास्तविक आपण कशासाठी आलो आहोत आपले ध्येय काय आहे हे विद्यार्थ्यांनी विसरू नये क्षणिक मोहापायी आपण आपल्या आयुष्याची राख रांगोळी करत आहोत हे या विद्यार्थ्यांना कोणी तरी समजावून सांगायला हवे त्यासाठी या विद्यार्थ्यांचे समुपदेशन व्हायला हवे. शिक्षक, समाज, शासन, प्रशासनाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जर अशाच घटना घडत राहिल्या तर पालक पुण्यात आपल्या पाल्याला शिकायला पाठवणार नाही. पुण्यातच नाही तर कोणत्याच शहरात पाठवणार नाहीत कारण पुण्यासारख्या शहरात जर मुली सुरक्षित राहू शकत नाही तर ती कुठेच सुरक्षित राहू शकत नाही अशीच पालकांची धारणा आहे.

सभ्य लोकांचे सुसंस्कृत शहर ही पुण्याची ओळख इतिहासजमा होते की काय अशी शंका येऊ लागली आहे कारण पुण्यात अलीकडे गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे.भर दिवसा मुलींची हत्या होत आहे याचाच अर्थ हल्लेखोरांना कायद्याचा धाक उरला नाही आपण काहीही केले तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही अशीच धारणा गुन्हेगारांची झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा भीती वाटत नाही. भर दिवसा जर अशा घटना घडत असतील ती पुणे पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. पुण्यात गुन्हेगारी अशीच वाढत राहिली तर भविष्यात पुण्याचा बिहार होऊ शकतो तो होऊ द्यायचा नसेल तर पोलिसांनी पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवीत.

महिला अत्याचार किंवा भर दिवसा मुलींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला तरच सभ्य लोकांचे सुसंस्कृत पुणे ही पुण्याची ओळख कायम राहील अन्यथा पुण्याचा बिहार होईल.