आम्ही सारे वारकरी…!

58

आम्ही सारे वारकरी…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

  आज देवशयनी आषाढी एकादशी त्या निमित्ताने सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक,हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र हि थोर संताची, तसेच महा पुरूषांनी भूमी आहे गेल्या कित्येक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्याने तसेच कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला,लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी असंख्य वारकरी बंधू, भगिणी कोसोदूर वरून पायी वारी करत असतात व मुखात ग्यानबा, तुकाराम, रामकृष्ण हरी विठ्ठल ह्या नामाचा अखंड जयघोष ठेवून वारी करत असतात. महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेर राज्यातून सुद्धा या एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत येत असतात व माता चंद्रभागेत आंघोळ करून मातेचे सुद्धा गुण गातात काही जुने लोक म्हणतात की, प्रत्येक माणसांनी आपल्या जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी व सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, काहीजण म्हणतात की,पंढरपूर‌ ही वैकुंठ नगरी आहे कदाचित असावेत म्हणूनच तर..त्या वारीत जातीभेद मुळात दिसत नाही व आपुलकीची भावना दिसत असते.

महान संत होऊन गेलेले संत चोखामेळा यांची अफाट भक्ती व निर्मळ भाव पाहून पांडुरंग त्याच्या सवे सदैव राहिला, त्यांची गुरे राखले व आजही देऊळात जाताना संत चोखोबा काकाचे दर्शन आधी होते नंतर पांडुरंगाचे दर्शन होते यातून आपण सर्वजण शिकायला पाहिजे की, भंगवताने कधीच जातीभेद केला नाही मग आपण कोण आहोत. ..? या पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येक माणूस प्राणी हा वारकरीच आहे कोणी साहित्याचा वारकरी होतो तर कोणी पांडुरंगाचा वारकरी होतो तर कोणी घरूनच वारी करत असतो भंगवताचे नामस्मरण करून शेवटपर्यंत जगत असतो.

       काहीजण म्हणतात की, देव वैगरे काहीच नसते सारी अंधश्रद्धा आहे हे त्यांचे विचार आहेत पण , कुठेतरी एक निसर्ग शक्ती मात्र आहेच हे कधी कळावे…? म्हणुन या बाबतीत सुद्धा विचार करुन बघावे कारण एका काळी संतांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आहेत व त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन त्याचे गुणगान केले आहेत,त्याची महिमा गायली आहे आजही त्यांच्या अंभगातून वाचायला मिळत असते. फरक एवढाच की, ते संत होते, भक्तीवान होते,ज्ञानी होते, त्यांच्यात अंधश्रध्दा नव्हती, मनात चांगले विचार व सहनशीलता होती, अफाट संघर्ष होता , दयाळू होते, पण ते जीवन जगताना कधीच डगमगले नाही तर आपले कार्य करतच राहिले व या समाजाला संदेश देत राहिले म्हणून भंगवतांनी त्या सर्वांना आपल्या जवळ जागा दिली म्हणून संत जनाबाई म्हणतात की, “विठू माझा लेकरवाळा” कारण ते नि:स्वार्थी होते व खास करून माणुस बनून जगले होते. आपणही माणूसच आहोत पण,होऊन गेलेल्या संतामध्ये व आपल्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यांचे अभंग आपण वाचतो पण, मात्र त्यांनी दिलेल्या संदेशातून आपण शिकु शकत नाही. म्हणून कुठेतरी आपली वाट चुकत असते व शेवटी त्या सावळ्या विठ्ठरायाला आपण दोष देत फिरत असतो.

या पृथ्वीतलावर जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा, माणूस म्हणूनच व एक वारकरी म्हणून झाला पण,आपण मात्र आपल्यातच शोधायला कदाचित विसरून जातो . सर्व काही आपल्याच पाशी असताना सुद्धा इकडे, तिकडे शोधण्यासाठी वेळ घालवत असतो यामध्ये कदाचित वेळ सुद्धा निघून जाते तरीही आपल्या लक्षात येत नाही. काहींना वाटते की, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी व विठूरायाचे दर्शन घ्यावे पण,त्यावेळी काहींच्या जीवनात अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे वारी पूर्ण होत नाही अशा वेळी दु:खी व्हायचे नसते घरूनही वारी करता येते मुखात विठुरायाचे नामस्मरण व हातात काम आणि आई,बाबांची सेवा, मुक्या प्राण्यांवर प्रेम,रंजल्या, गांजलेल्या चे अश्रू पुसणे व मनात चांगले विचार ठेवून जगले तर ही एक प्रकारची वारीच केल्यासारखे आहे. पण,आपण मात्र या साऱ्या गोष्टीला महत्व न देता काम, क्रोध, लोभ, अंहकार, अभिमान, निंदा,चुगली, हिंसा, घाणेरडी वाचा, भांडण, मारामारी, व्यसन, चोरी, चिटोरी या साऱ्या व्यर्थ गोष्टींच्या नादी लागून जगत असतो तर भगवान तरी कसा भेटेल…?

     त्यासाठी थोर संतानी दाखविलेल्या मार्गावरून चालत रहाणे हेच प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे व त्यांनी दिलेले संदेश आत्मसात करून आचरणात आणायचे आहे एवढेच नाही तर समाजात सुद्धा त्यांची पेरणी करायची आहे. शेवटी या जीवनात काय ठेवले आहे एक दिवस तर. प्रत्येकाला जाणेच आहे म्हणून नुसते असेच जगण्याला काहीही अर्थ नाही तर एक चांगला माणूस बनून, वारकरी बणून जगणे याला खरा अर्थ आहे नाही तर…सारं काही व्यर्थ आहे असे जगणेच सोडून द्यावे व स्वतः वर विश्वास ठेवून प्रसन्न मनाने रहावे मुखात पांडुरंगाचे नामस्मरण ठेवून आपल्या जीवनाची वारी पूर्ण करावी. आपण सारे वारकरी आहोत हेच सर्वांना कळायला पाहिजे एकमेकात वैरता निर्माण न करता बंधू भावाचे नाते जोडून जगावे आपले या प्रकारचे जगणे पाहून कदाचित निसर्गही धन्य होईल असेच जगावे.