गरज सरो वैद्य मरो…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

भारताच्या शेजारी राष्ट्रांची भूमिका शेजाऱ्यांशी प्रेमाने वागावे, शेजारी जेंव्हा संकटात असेल तेंव्हा त्यांना मदत करावी ही आपली संस्कृतीच आहे. याच संस्कृती नुसार भारताने आजवर आपल्या शेजारी असलेल्या सर्वच देशांना मदत केली आहे. जेंव्हा जेंव्हा हे शेजारी देश संकटात असतात तेंव्हा तेंव्हा भारताने या देशांना मदत केली आहे. शेजाऱ्यांचा मदतीला धावून जाणे ही भारताची परंपराच आहे मात्र हेच शेजारी देश जेंव्हा त्यांची गरज भागते तेंव्हा गरज सरो वैद्य मरो या म्हणी प्रमाणे भारताला विसरून चीनशी जवळीक करतात हे चित्र मागील काही वर्षात पाहायला मिळत आहे. आताही तेच चित्र पाहायला मिळत आहे.

आता हेच पहा ना काही महिन्यांपूर्वी श्रीलंका हा भारताचा शेजारी असलेला देश अक्षरशः भिके कंगाल झाला होता. लोकांना एकवेळचे अन्न मिळत नव्हते देशात सर्वत्र अराजकता माजली होती. जनता रस्त्यांवर उतरून सत्ताधाऱ्यांना कपडे फाटेस्तोवर मारत होती. राजकीय नेत्यांची घरे जाळत होते. नेतेमंडळी देश सोडून पळत होते अशावेळी त्या देशात शांतता नांदावी, लोकांना पोटभर अन्न मिळावे, देशाला स्थिर सरकार मिळावे यासाठी भारतानेच पुढाकार घेतला. श्रीलंकेला या भीषण परिस्थितून बाहेर काढण्यासाठी भारताने ४ अरब डॉलरची मदत केली. भारताच्या मदतीमुळे हा देश सावरला. नवीन स्थिर सरकार स्थापन झाले. देशाला अराजकतेतून बाहेर काढणाऱ्या भारताचे तिथल्या सरकारने आभार मानायला हवे मात्र श्रीलंकेत आज सत्तेवर असलेल्या सरकारने भारताचे आभार मानायचे सोडून भारताचा शत्रू असलेल्या चीनशी जवळीक साधली आहे. ज्या चिमनुळेच श्रीलंका भिके कंगाल झाला त्याच चिनसोबत राहण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतल्याने आश्चर्य वाटत आहे.

श्रीलंकेचे विदेशमंत्री अलिसाबरी यांनी चीनच्या विदेशमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशात अनेक करार झाले. या बैठकीत बीआरसी प्रोजेक्टची यशस्विताही निश्चित करण्यात आली इतकेच नाही तर भारत आणि चीन यांच्यातील संबंधात श्रीलंका तटस्थ राहील अशी ग्वाहीही श्रीलंकेच्या विदेशमंत्र्यांनी चीनला दिली. ही सर्व चीड आणणारी बाब आहे कारण ज्या भारताने श्रीलंकेला संकटकाळात मदत केली त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे सोडून ज्यांनी श्रीलंकेला भिके कंगाल केले त्याच चीनच्या बाजूने श्रीलंका उभी राहिली आहे. केवळ श्रीलंकाच नाही तर नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार हे देशही छुपे रुस्तम आहेत. त्यांच्यावर संकट आले की ते भारताची मदत घेतात आणि संकट टळले की पुन्हा चीनचे तळवे चाटतात.

भारताचा सख्खा शेजारी आणि जगातील एकमेव हिंदू देश असलेला नेपाळने चीनच्या सांगण्यावरून भारताच्या लिलुपेक , लिंपुया धुरा या भागावर दावा करून भारताला दुखावले आहे. भुतानला भारताने संसद भवन बांधून दिले मात्र तेथील राजे कायम चीनच्या पाठीशी उभे राहिले आहेत. म्यानमारमध्ये लोकशाही नांदावी यासाठी भारताने अनेकदा प्रयत्न केले मात्र तेथील लष्करशाही चीनच्या पाठीशी उभी असते. बांगलादेशलाही भारताने अनेकदा मदत केली मात्र बांगलादेशचे सैनिक सीमेवर कायम भारतीय सैनिकांशी वाद घालत असतात. बांगलादेश रायफल आणि भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांमध्ये अधूनमधून गोळीबार होत असतो बांगलादेश मधून दररोज हजारो घुसखोर भारतात प्रवेश करत असतात.

भारताने अनेकदा बांगलादेश सरकारकडे तक्रार करूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. एकूणच भारताने संकट काळात मदत करूनही भारताचे शेजारी भारताशी गद्दारी करून चीनशी हातमिळवणी करतात त्यामुळे यापुढे या देशांना मदत करताना भारताने व्यवहारवादी भूमिका घ्यावी. जर हे देश भारताशी गद्दारी करून चीनला मदत करत करावी की नाही याबाबत भारताने गांभीर्याने विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here