राजेश बेले यांच्या नेतृत्वात घातक प्रदूषणाच्या विरोधात तीव्र घंटानाद आंदोलनाला सुरुवात
• जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर कार्यालयासमोर छेडले आंदोलन
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱8830857351
चंद्रपूर : 19 जुलै : चंद्रपूर जिल्हा हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अतीप्रदूषित जिल्हा म्हणून जिल्ह्याची व चंद्रपूर शहराची ओळख आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या घातक प्रदूषणामुळे अनेक असाध्य आजार मानवासोबतच प्राणी, पक्षी वन्यप्राणी, जंगल, वायू, जल, मृदा एकंदरीतच संपूर्ण पर्यावरणाची मोठी हानी होऊन पर्यावरणातील जीवांसाठी घातक ठरत आहेत.
अश्यातच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयात मनुष्यबळ (अधिकारी वर्गाची) कमतरता असल्यामुळे जिल्हयातील वाढते प्रदुषण लक्षात घेता तत्काळ येथे मनुष्यबळ व अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात यावी व अन्य प्रदूषणाला कारणीभूत मागण्यांना घेऊन संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर तसेच महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, चंद्रपूर कार्यालय परिसरात घंटा नाद आंदोलन करुन तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राजेश बेले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,अध्यक्ष, सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी आदींना निषेध व्यक्त करीत पत्राद्वारे या आंदोलनाची माहिती देऊन आपला विरोध दर्शविला.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आदी आहेत. परंतू महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकाऱ्याच्या भरोवश्यावर तीन जिल्ह्यांचा कार्यभार असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता आवश्यक उपाय योजनेसाठी अतिरिक्त मुनष्यबळ आवश्यक आहे.
प्रदुषणाच्या टक्केवारीत चंद्रपूर जिल्हा देशात चौथ्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात आघाडीवर आहे. सोबतच यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातही मोठया प्रमाणात प्रदूषणात लक्षणीय वाढ होेत आहे. गडचिरोली जिल्हयात लोह खनिज, आयर्न प्लॉन्ट, चुनखडी खानी, सिमेंट प्लॉन्ट इत्यादी प्रदूषणाला चालना देणारे उद्योग सुरु झाले आहे. याकरिता जनआंदोलनाची आवश्यकता होती म्हणून आपण हे आंदोलन राज्यशासन, केंद्रशासन यांच्या निषेधार्थ सुरु केले आहे अशी माहिती राजेश बेले यांनी दिली. यावेळी अनेक नागरिकांची उपस्थिति होती.