नऊ ठिकाणी घरफोडी करणार्‍या आरोपीं भावांना अटक, 6 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त

अश्विन गोडबोले

चंद्रपूर ब्युरो चीफ

मो: 8830857351

चंद्रपूर, 22 जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाणेअंतर्गत 9 ठिकाणी घरफोड्या करणार्‍या आरोपींना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रभु सुब्रमन्यम सानिपती व राकेश सुब्रमन्यम सानिपती असे अटकेतील आरोपींची नावे आहे. भद्रावती तालुक्यातील वांढरी फाटा येथील श्रीकांत अधिकारी हे 17 जून 2023 रोजी आपल्या परिवारासह रात्री जेवण करून घरात समोरील खोलीत झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने खिडकीची ग्रिल वाकवून शयनगृहात प्रवेश केला व शयनगृहातील लॉकर उघडून त्यातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल व कागदपत्रे चोरून नेली. या बाबतच्या तक्रारीवरून पडोली पोलिस ठाण्यात कलम 457, 380 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात सुरू करण्यात आला.

तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक व्यक्ती सोन्याचे दागिणे विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत रयतवारी चौकात उभा असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने प्रभु सानिपती याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने राकेश सानिपती याच्यासह वांढरी फाटा येथे तसेच जिल्ह्यातील भद्रावती, दुर्गापूर, वरोडा पोलिस ठाणे हद्दीत 9 घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे दागीने व नगदी रोख असा एकूण 6 लाख 8 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक रीना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले, हवालदर संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, गजानन नागरे, संतोष येलपुलवार, गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, अजय बागेसर आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here