मानवतेला काळिमा फासणारी घटना…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा

मो: ९९२२५४६२९५

मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये दोन समाजात जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात दोन्ही समाजातील काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे त्याच हिंसाचारादरम्यान एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांचा सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. त्या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने ती जगापुढे आला. हा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली. हा सर्व प्रकार पाहून आपण माणूस म्हणून घेण्याच्या खरंच लायक आहोत का ? असा प्रश्न पडला कारण ज्या वेळी या महिलांची नग्न धिंड काढण्यात आली त्यावेळी जमावतील लोक त्या महिलांकडे निर्लज्जपणे पाहून हसत होते.

महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण होताना कृष्ण धावून आला मात्र आजच्या कलयुगात द्रौपदी तशीच नग्न होत असताना समाज मात्र धृतराष्ट्राची भूमिका घेत आहे. विशेष म्हणजे या दोन पीडित महिलांपैकी एका महिलेचा पती कारगिल युद्धात शौर्य गाजवलेला जवान होता. सीमेवर देशासाठी शौर्य गाजवून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या या जवानाच्या पत्नीच्या अब्रूचे अशी लक्तरे होत असताना भारत मातेचीही मान शरमने खाली झुकली असेल. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना पाहून सर्वोच्च न्यायालयाचा देखील तिळपापड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याचे आदेश मणिपूर सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यावर मणिपूर सरकार ऍक्शन मोडमध्ये आले.

वास्तविक या सर्व प्रकाराला मणिपूर सरकारच जबाबदार आहे. मणिपूर मधील हिंसाचाराला आज तीन महिने होत आले तरी मणिपूर सरकारने ते रोखण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत. एखाद्या राज्यात तीन महिने हिंसाचार चालणे हे तेथील सरकारचे मोठे अपयश म्हणावे लागेल. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या तेथील सरकारला बरखास्त करायला हवे. वास्तविक याआधीच हे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती तसे केले असते तर आज जगापुढे भारताची जी नाचक्की झाली ती झाली नसती. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. गल्ली ते दिल्ली या घटनेचा निषेध होत आहे. विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध करत संसद डोक्यावर घेतली आहे. विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध केल्यावर सत्ताधारीही विरोधी पक्षांच्या राज्यातील महिला अत्याचाऱ्याच्या घटना उघडकीस आणून विरोधी पक्षांना घेरत आहे. राजकीय नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात देशातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

वास्तविक आपल्या देशात महिला भगिनींना देवीचा दर्जा दिला जातो. लक्ष्मी, सरस्वती आणि जगदंबेची उपमा देऊन त्यांनव पुजले जाते त्याच देशात माता भगिनींच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जातात याला काय म्हणावे. केंद्रसरकारने आता तरी हा हिंसाचार थांबवून मणिपूरमधील महिलांना सुरक्षा देण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here