कणेकर गेले ; खुमारदार लेखणी थंडावली…
महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक, पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या लाखो वाचकांना धक्का बसला कारण शिरीष कणेकर असे अचानक आपल्यातून निघून जातील असे कोणालाही वाटले नव्हते कारण त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीही त्यांनी लिहिलेले लेख वर्तमानपत्रात छापून आले होते त्यामुळे त्यांचे निधन सर्वांसाठी धक्कादायकच होते.
माझ्यासाठी तर ते अधिक धक्कादायक होते. कारण माझे ते सर्वात आवडते लेखक होते त्यांची जवळपास सर्वच पुस्तके मी वाचून काढली आहेत. वर्तमानपत्रातील त्यांचे लेख वाचूनच मी स्तंभ लेखनाकडे वळलो. त्यांच्या लेखाचा विषय हा माझा सर्वात आवडता विषय, माझाच कशाला आज जे चाळीस पन्नाशीत आहे त्या सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे चित्रपट आणि क्रिकेट. वर्तमानपत्रातील त्यांचे चित्रपट आणि क्रिकेटचवरचे लेख आले की ते झटक्यात वाचून संपवणे आणि त्यावर चर्चा करणे हा आमच्या मित्रमंडळींचा आवडता छंद. त्यांच्यामुळेच आम्हाला जुन्या काळातील कुंदनलाल सैगल, दिलीपकुमार, अशोककुमार, राज कपूर, देवानंद या अभिनेत्यांची ओळख झाली तसेच पन्नास ते सत्तरच्या दशकातील क्रिकेट खेळाडूंची ओळख झाली.
केवळ अभिनेते किंवा अभिनेत्रीच नव्हे तर हिंदी सिनेसंगीत हा ही त्यांच्या लेखनाचा आवडता विषय.अतिशय अभ्यासपूर्ण, खुसखुशीत आणि विनोदीशैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. अतिशय खुसखुशीत विनोदी शैलीत ते लिहीत असल्याने तरुण वर्ग त्यांचा मोठया वाचक बनला. तरुण मुले कट्ट्यावर बसून ज्याप्रमाणे गप्पा मारत अगदी तसेच त्यांचे लेखन होते त्यामुळेच त्यांचा सर्वाधिक वाचक वर्ग हा तरुण होता. वर्तमानपत्रात लेख लिहून स्तंभलेखक म्हणून लोकप्रिय झालेले शिरीष कणेकर यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली. यादो की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सुरपारंब्या, सिनेमगिरी, लगाव बत्ती, कणेकरी, चिमटे आणि गाळगूच्चे, आसपास, मेतकूट, चित्ररूप, कल्चर, व्हल्चर असं त्यांचं विविध वर्तमानपत्रामधलं स्तंभलेखन गाजलं.
गाये चला जा, यादो की बारात, एककेचाळीस, गोळी मार भेजे मे, गोतावळा, कुरापत, मखलाशी, फटकेबाजी, पुन्हा यादो की बारात, टिवल्या बावल्या, चंची, चापट पोळी, चापलुसकी, डॉलरच्या देशा, एकला चलो रे रहस्यवल्ली, सुरपारंब्या, इरसालकी, क्रिकेटवेध, नट बोलट बोलपट, शिनेमा डॉट कॉम ही त्यांची पुस्तके खूप लोकप्रिय झाली. शिरीष कणेकर यांनी लेखनासोबतच क्रिकेट व चित्रपटावर स्टॅण्ड अप शो देखील केले. माझी फिल्लमबाजी, फटकेबाजी आणि कणेकरी हे त्यांचे स्टॅण्ड अप शो खूप लोकप्रिय झाले. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले पण वाचकांच्या मनात त्यांचे जे स्थान होते ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ होते. आपल्या खुमासदार लेखणीने तरुण वाचकांच्या मनात आगळे स्थान निर्माण करणारा हा अवलिया लेखक आज आपल्यात नाही हे मन मानायला तयार नाही. शिरीष कणेकरांची फिल्लमबाजी, फटकेबाजी पुन्हा अनुभवता येणार नाही याची खंत वाटते. असो नियतीने जे मांडून ठेवले ते स्वीकारावेच लागेल. शिरीष कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
(सदर लेखात मांडलेली मत ही पुर्णतः लेखकाची वैयक्तिक मत असून मीडियावार्ता वृत्तसंस्था सदर प्रत्येक मतांशी सहमत असेलच असे नाही)