उडता महाराष्ट्र करण्याचा डाव…

छत्रपती संभाजी नगर येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा ( ड्रग्स ) जप्त केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. या ड्रग्सची किंमत कैक कोटींच्या घरात आहे. अर्थात पोलिसांकडून अथवा तपास यंत्रणेकडून ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाही.याआधी पुणे, मुंबई आणि कोकणात अशाप्रकारचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात ड्रग्सचे मोठे रॅकेट कार्यरत असून ते महाराष्ट्रातील तरुणांना ड्रग्सची लत लावून महाराष्ट्राला उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्नात आहेत.

काही वर्षांपूर्वी पंजाबलाही असाच ड्रग्सचा विळखा पडला होता आणि पंजाब मधील तरुण वर्ग नशेचा आहारी गेला होता म्हणून त्याला उडता पंजाब असे नाव देण्यात आले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याचा डाव तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. अर्थात ड्रग्स तस्कर यात काही प्रमाणात यशस्वी होतानाही दिसत आहे कारण अलीकडे शहरी भागातील उच्चभ्रू तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका रेव्ह पार्टीचा पर्दापाश केला होता. या रेव्ह पार्टीत महाविद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थ्यांनी ड्रग्सचे सेवन केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अर्थात अशाप्रकारच्या रेव्ह पार्ट्या राज्यातील मोठ्या शहरात चालू असतात. राज्यात अमली पदार्थ विक्रीवर बंदी आहे असे असताना राज्यात ड्रग्ससह सर्वच अमली पदार्थांची बेधकडक विक्री चालू आहे. ड्रग्स, गांजा यासारख्या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट द्वारे ऑनलाइन ड्रग्सची विक्री केली जाते असे खुद्द पोलिसांनीच सांगितले आहे.

अर्थात अमली पदार्थांचा हा विळखा फक्त तरुणांभोवतीच आहे असे नाही तर अमली पदार्थांचा हा विळखा संपूर्ण समाजाला पडत आहे. अमली पदार्थांनी संपूर्ण समाज पोखरून काढण्याचा डाव या समाज कंटक तस्करांचा आहे म्हणूनच तो चिंताजनक आहे. ड्रग्स तस्करांचा हा डाव जर यशस्वी झाला तर पंजाब प्रमाणे महाराष्ट्रही उडता महाराष्ट्र बनेल आणि संपूर्ण युवा पिढीच उध्वस्त होईल म्हणून ड्रग्स तस्करांचा हा डाव उधळून लावण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि इतर तपास यंत्रणेपुढे आहे. राज्यातील ड्रग्स तस्करांचे पाळेमुळे खणून काढून तरुण पिढीला वाचवण्याची जबाबदारी पोलिसांची किंवा सरकारची जितकी आहे तितकीच ती पालकांची आणि समाजाची देखील आहे.

आपली मुले काय करतात, आपण दिलेल्या पैशांचा उपयोग ते कशासाठी करतात यावर पालकांनी नजर ठेवायला हवी. समाजानेही आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाली चालू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवण्याची आणि महाराष्ट्राला उडता महाराष्ट्र होऊ न देण्याची जबाबदारी शासन, प्रशासन, पोलीस, पालक आणि समाज या सर्वांचीच आहे.

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे, मो: ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here