जखमा जुन्याच परंतु इर्शाळवाडी सारखे नवीन – नवीन घाव चिंताजनक
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी सारख्या अनेक दुःखद घटना पुर्वीही झाल्यात परंतु कोणतीही सरकार त्यावर फुंकर घालू शकले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.याचे दुःख राज्याच्या 13 कोटी जनतेला अवश्य होत आहे.इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुःखद आणि अंगावर शहारे येणारी होती.दिनांक 20 जुलै 2023 ला कोसळत्या धुव्वाधार पावसात आणि गार वाऱ्यात 49 कुटुंब गाढ झोपेत होते तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत खाली आला आणि त्याने अर्धावरून अधिक गाव गिळंकृत केले यात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 52 ग्रामस्थ अजुनही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.यापुर्वीही अशाच भयावह घटना आपण उघड्या डोळ्यांनी पहिल्यात यावर सरकारने तात्पुरती उपाययोजना केली व शांत बसली. परंतु पुन्हा-पुन्हा त्याच दुःख घटना उद्भवतात व जखमा करून जातात यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
राज्यात अजुनही असे अनेक क्षेत्र आहे की त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाचे तांडव,काळीज चिरणाऱ्या दुर्घटना आणि मृतदेहाचे ढिगारे हे अलीकडे रायगड जिल्ह्यातील आणि पावसाळ्याचे जणू नवे समीकरण तयार झाले की काय असे वाटते.यापुर्वी दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच ईर्शाळवाडीची भयावह घटना घडली.26 जुलै 2005 ला दासगाव,जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळून 194 जणांचा मृत्यू झाला होता,2 ऑगस्ट 2016 ला सावित्री नदीवरील पूल कोसळून 40 जणांचा बळी गेला,25 ऑगस्ट 2020 ला महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून 16 जण मृत्युमुखी पावले,22 जुलै 2021 ला पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन दरडीखाली 6 जणांचा मृत्यू झाला,याच दिवशी 22 जुलै 2021 ला महाड तालुक्यातील तळीये हे गाव डोंगराखाली गडप झाले आणि 87 लोकांचा जीव गेला.
ह्या सर्व घटना होऊन गेल्या तरी प्रशासन व सरकायला वेळीच जाग येत नाही व वेळेवर तारांबळ उडते आणि धावपळ मचते.त्यामुळेच पुन्हा-पुन्हा जुन्या जखमा ताज्या होतांना दिसतात व ईर्शाळवाडी सारखा जब्बर घाव सहन करावा लागतो हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यातील दरड कोसळण्याच्या घटना मुख्यत्वेकरून वृक्षतोडीमुळे होत आहे ही बाब सरकारला माहित असुन सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सपाट्याने सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते.आज राज्यासह देशात मोठमोठे महामार्ग (हायवे), औद्योगिकीकरण,रस्ते रूंदीकरण,वाढत्या लोकसंख्येमुळे वस्त्यांचे वाढते प्रमाण यामुळे दऱ्याखोऱ्याना मोठे नुकसान होत आहे व धाराशाही होतांना आपण पहातो.ग्लेशिअर वितळले अशा अनेक नवीन-नवीन आपदा निर्माण होत आहे अती पावसामुळे संपूर्ण पाणी समुद्रात जाऊन दिवसेंदिवस समुद्राची पातळी वाढत आहे ही मानवजातीसाठी व पृथ्वीतलावरील जीवजंतूसाठी धोक्याची घंटा आहे.हे सर्व प्रकार लाखो-करोडोच्या संख्येने वृक्षतोड केल्याने होत आहे.त्याचाच परिणाम आज आपल्याला नैसर्गिक आपदाच्या रूपात पहायला मिळत आहे.यात दरड कोसळणे, अतीपाऊस, अती थंडी,अती उष्णतेच्या रूपात भोगावा लागते आहे.
राज्यातच नाही तर देशात अनेक नैसर्गिक आपदा येत असतात. परंतु यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर पुन्हा-पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतांना आपल्याला दिसते आणि दिसेल सुध्दा.आपण देशाचा विचार केला तर एकट्या 2022 मध्ये 387 नैसर्गिक आपत्ती आल्यात त्यात 30704 लोकांचा मृत्यू झाला.इर्शाळवाडी सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने वेळोवेळी पाऊले उचलली पाहिजेत.1900 ते 2022 पर्यंतची भारतातील नैसर्गिक आपत्तीची आकडेवारी पहाली तर चकीत करणारी आहे या कालावधीत 764 नैसर्गिक आपत्ती आल्यात यात 91 लाख 35 हजार 556 लोकांचा मृत्यू झाला याचा फटका सर्वाना सहन करावा लागला.ह्या सर्व घटना बदलत्या हवामानामुळे होत आहे. कारण भारतातीलच नाही तर जगातील 40 टक्के जंगलसंपदा वृक्ष तोडीमुळे नेस्तनाबूत झाली आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारत,चीन, दक्षिण कोरिया, आणि बांगलादेश महापुराच्या विरखळ्यात अडकलेला आहे.तर दुसरीकडे थंड हवामानाच्या युरोपमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या काही राज्यांत उष्णतेची लाट आहे तर काही राज्यांना पुराचा तडाखा बसला आहे. ब्रिटनमध्ये नेहमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने ब्रिटन जलमग्न झाले आहे.
तापमानातील वाढ आणि हवामानातील बदलांचे फटके जगभरातील बहुतेक देशांना बसायला सुरुवात झाली आहे.कोरड्या प्रदेशात मुसळधार पाऊस,तर पावसाच्या प्रदेशांत दुष्काळ अशी विपरीत परिस्थितीत जगभर निर्माण होऊ लागली आहे.यामुळे एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे महापुर अशें विचित्र संकट जगावर ओढावल्याचे दिसून येते.हे सर्व संकट मानवाने स्वतःहून ओढावले आहे. त्यामुळे ईर्शाळवाडी सारख्या घटनांची पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याकरिता सरकारने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून वेळोवेळी पाऊले उचलली पाहिजेत. तेव्हाच आपल्याला नैसर्गिक आपदाच्या घटनांवर थोडा का होईना अंकुश लावण्यास मदत होईल.सध्याच्या परिस्थितीत शासन आपल्या दारी ही संकल्पना सरकारची स्वागतार्ह आहे.परंतु याची सुरुवात ग्रामीण भागात व दऱ्याखोऱ्यातील भागात युध्दपातळीवर राबविली पाहिजे.यामुळे ज्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे त्याठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकारला मोठी मदत होईल.त्यामुळे सरकारला विनंती आहे की वृक्षतोड ताबडतोब थांबविली पाहिजे व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून दऱ्याखोऱ्याना पुनर्जीवित केले पाहिजे हिच सरकार कडून अपेक्षा!, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रासह देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे रेड अलर्टवर आहे.त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्ये सुध्दा रेड अलर्टवर आहे.कुठे ढगफुटी तर कुठे सतत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगावी आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी व प्रशासनाची मदत घ्यावी.कारण देशातील पावसाचा धोका अजून पर्यंत कळलेला नाही. सावधान!
रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर
मो: 9921690779