पालघरमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; 14 किलो सोने, 60 लाखांची रोकड एकूण सात कोटी साठ लाखांचा ऐवज चोरून नेला

पालघरमधील बोईसर येथील बाजारपेठेत ज्वेलर्सवर दरोडा पडला. सहा ते सात जणांच्या टोळीने 14 किलो सोने आणि जवळपास 60 लाखांची रोकड लंपास केली. गॅस कटरच्या मदतीने त्यांनी ज्वेलर्समधील लॉकर तोडले.

हिरामण गोरेगांवकर

पालघर:- जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बोईसर येथील बाजारपेठेत एका सोन्या-चांदीच्या दुकानाची भिंत व गॅस कटरच्या साह्याने भरभक्कम लॉकर तोडून दरोडेखोरांनी लॉकरमधील 14 किलो सोने व 60 लाख रुपयांची रोख रक्कम असे एकूण सात कोटी साठ लाखांचा ऐवज चोरून नेला. पालघर  जिल्ह्यातील या वर्षातील सर्वात मोठा दरोडा समजला जात असून मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दरोडेखोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

बोईसर-तारापूर या मुख्य व दिवसरात्र प्रचंड वाहतूक असलेल्या राज्य मार्गावरील चित्रालय या गजबजलेल्या व्यापारी पेठेतील साई शॉपिंग सेंटरमध्ये श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुमजली दुकान आहे. त्या दुकानालगत असलेल्या पहिल्या मजल्यावरील क्लासेसच्या शटरचे कुलूप दारोदेखोरांनी प्रथम तोडले. क्लासेस व ज्वेलर्सच्या दुकानामधील भिंत एक ते दीड फुटाची गोलाकार कापून त्यामधून ऑक्सिजनचे मोठे व एलपीजीचे छोटे अशी दोन गॅस सिलिंडर आत नेली. गॅस कटरने लॉकर कापून दरोडा टाकून पोबारा केल्याची घटना घडली. मंगळवार मध्यरात्री 2.30 वाजता दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज असून दरोडेखोरांनी प्रथम सर्व सायरनचे व सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून नंतर लूट केली. सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये 8 ते 9 जण दिसत आहेत. भर वस्तीत दरोडा पडल्याने बोईसरसह जिल्ह्यातील सुवर्णाकार दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, बोईसर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वास वळवी, बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली. तर श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. आम्ही लवकरात लवकर मुद्देमालासह दरोदेखोरांना पकडू, असे बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here