माता न तू वैरिणी, अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाचा सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने केला खुन.

नऊ महिने आपल्या पोटात वाढविणाऱ्या बाळाला जन्म देत तब्बल सात वर्षे सांभाळ करणारी आईच त्याच्या मृत्यूला कारणीभुत ठरली. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यांतर प्रियकरासोबत राहत असताना अनैतिक संबंधामध्ये पोटच्या मुलाची बाधा येऊ लागल्याचे समजून प्रियकराच्या मदतीने त्या चिमुकल्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक :- पहिल्या पतीपासून जन्मलेल्या सात वर्षाच्या मुलाचा सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने भिंतीवर डोके आपटून खुन केल्याचा प्रकार नाशिक पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आई आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे.

साईनगर येथे अंगणात खेळत असताना मोहित घनश्याम जाधव या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना 21 डिसेंबर रोजी घडली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात या मुलाला आणण्यात आले होते. आडगाव पोलिसांनी याची अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तसाच सोडून त्याची आई संशयित सुलोचना सोमनाथ कुर्‍हाडे व सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुर्‍हाडे वय 23, रा. साईनगर, नांदुरनाका हे दोघे फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संशय आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी मुलाच्या आईवडिलांचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्यांच्या घरात मिळालेल्या धागेदोर्‍यांवरुन सोमनाथ याला पेठ रोडवरील वसाहतीतून अटक तर, सुलोचना हिला कोपरगाव येथून पकडण्यात आले. दोघांनी मुलाला मारल्याची कबुली दिली.

पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यावर सुलोचना हिचे सोमनाथबरोबर संबंध निर्माण झाले. मुलगा मोठा झाल्याने त्याला दोघांच्याबाबत संशय येऊ लागला. त्यामुळे अनैतिक संबंधात मुलाचा अडसर होऊ लागल्याने त्यांनी मुलाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा खुन केल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली असून रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here