पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला
सत्यशोधक विचारधारेचे पाईक, महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीतील प्रमुख मार्गदर्शक, जेष्ठ विचारवंत, लेखक आणि पुरोगामी चळवळीचे आधारवड प्राध्यापक हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. प्रा हरी नरके यांचे वय अवघे साठ वर्ष इतके होते. या वयात ते असे अकाली निघून जातील असे कोणाला वाटले नव्हते त्यामुळेच त्यांचे निधन सर्वांसाठी धक्कादायक आहे. विशेषतः पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तर हा मोठा धक्का आहे. प्रा हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली आहे कारण सध्याच्या उन्मादी वातावरणात पुरोगामी चळवळीचा किल्ला खंबीरपणे लढवणारे खंदे शिलेदार हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत त्यात हरी नरके हे एक होते.
१ जून १९६३ रोजी जन्मलेले प्रा हरी नरके सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारधारेची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर फुले, आंबेडकर यांचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. प्रा हरी नरके सरांनी आपल्या लेखणी आणि वाणीतून बहुजनांना जागृत करण्याचे काम केले. विशेषतः ओबीसी समाजाला जागृत करण्याचे महत्वाचे काम हरी नरके सरांनी केले. ओबीसींच्या हक्क आणि अधिकारांसाठी हरी नरके सर आयुष्यभर लढत राहिले. खास करून जेंव्हा जेंव्हा ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न समोर आला तेंव्हा तेंव्हा हरी नरके सर उभे राहिले. महाराष्ट्रातील ओबीसी आयोगाच्या माध्यमातून देखील त्यांनी ओबीसींसाठी मोठे काम केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य विविध खंडाद्वारे करण्याचा प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्प मंडळाच्या संपादक मंडळात प्रा हरी नरके सर होते. त्यांनी त्या खंडांना आकार दिला.
महाराष्ट्र सरकारने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानांचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके सरच होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाड.मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले त्यातील सहा खंडाचे संपादन हरी नरके सरांनी केले होते. हरी नरके यांच्या या साहित्यामुळे महाराष्ट्रातील समग्र अभ्यासकांना फुले आंबेडकर कळू शकले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जी रंगनाथ पठारे समिती स्थापन केली होती त्यात हरी नरके सर होते. समता परिषदेचेही ते पदाधिकारी होते या संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी ओबीसींचे प्रश्न सरकार दरबारी मांडले.
प्रा हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा हे ते दोन पुस्तके आहेत. त्यांची ही पुस्तके त्यांनी संपादन केलेले फुले आंबेडकरांचे समग्र खंड म्हणजे मराठी साहित्यातील महत्वाचा ठेवा आहे येणाऱ्या पिढीला फुले आंबेडकर समजून घेण्यासाठी या खंडाची मोठी मदत होणार नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची देखील मोठी हानी झाली आहे. प्रा हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५