प्लास्टिकबंदीच्या विरोधात कारवाईत सातत्य हवे…
प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या विशेष पथकांनी १ जुलै २०२२ पासून मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली होती मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती आता पुन्हा मुंबई महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत ज्या दुकांदारांवर कारवाई करण्यात येत आहे त्यांच्याकडून मोठा दंड वसूल केला जात असल्याने दुकानदारांत नाराजीची भावना आहे अर्थात ही दंडाची रक्कम किती असावी हा वादाचा विषय असला तरी सध्या जी कारवाई चालू आहे तिचे स्वागतच आहे मात्र मुंबई महानगर पालिकेला आताच प्लास्टिक विरोधात मोहीम उघडावी असे का वाटले ? हा प्रश्न आहे.
प्लास्टिक बंदीचा कायदा राज्यात असताना ही कारवाई का थांबवण्यात आली ? दुसरी बाब म्हणजे प्लास्टिक विरोधातील कारवाई करताना छोट्या मोठ्या दुकानदारांनाच का टार्गेट करण्यात येते ? कारवाई करायचीच असेल तर प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर करावी. जर कारखान्यात प्लास्टिकची निर्मितीच झाली नाही तर दुकानदार प्लास्टिक आपल्या दुकानात ठेवणारच नाही. प्लास्टिकची निर्मिती करणारे कारखाने माहीत असूनही महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी छोट्या मोठ्या दुकांदारांवरच कारवाई का करत आहे ? याचे उत्तर महानगरपालिकेने द्यावे. मुळात प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर अनेकदा त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. मुळात कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबत दुकानदार संभ्रमात आहे. कारण सरकारने वेळोवेळी शुद्धीपत्रक काढून त्यात बदल केला आहे.
महानगरपालिकेने कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबत दुकांदारांसह जनतेलाही पुन्हा एकदा अवगत करून द्यायला हवे. मागील वर्षी केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली होती त्या बंदीचेही नागरिकांनी स्वागतच केले होते मात्र ती बंदी केवळ कागदावरच आहे कारण सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असूनही सिंगल युज प्लास्टिकचा आजही सर्रासपणे वापर होताना दिसत आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाल्याचे वर्षभरात निदर्शनास आले नाही.
प्लास्टिकचा पर्यावरणाला असणारा धोका आणि मानवी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, प्लास्टिक बंदीचे कोणीही समर्थनच करतील पण बंदीची अंमलबजावणी करताना छोटे दुकानदार आणि मोठे उद्योगपती असा भेदभाव करू नये शिवाय कारवाईत सातत्य हवे. महानगरपालिकेने केवळ दिखाव्यासाठी कारवाई करू नये तसे केले तर प्लास्टिक बंदीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५