चंद्रपूर चिमूरमध्ये खोदकामात सापडले 18 व्या शतकातील दोन शिवलिंग

 

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर, 30 ऑगस्ट: चिमूर तालुक्यातील नेरी या गावी सुरू असलेल्या खोदकामात नेमक्या श्रावण मासातच पांढर्‍या व काळ्या दगडाचे दोन शिवलिंग सापडल्याने भाविकांत मोठा उत्साह आहे. बुधवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी एका खोदकामाच्या जागी ही दोन शिवलिंग सापडली. ती साधारणतः 18 व्या शतकातील असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

• श्रावण मासात शिवलिंग सापडल्याने भाविकांत आनंद
• काळ्या व पांढर्‍या दगडात केले आहे कोरीव काम
• नेरीचे प्राचीन महत्त्व पुन्हा अधोरेखित

यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक आणि इन्टॅक संस्थेच्या संचालन समितीचे सदस्य अशोक सिंग ठाकूर यांना विचारले असता, हे दोन्ही शिवलिंग मराठा काळातील आहेत. भोसले यांचे सत्ताकाळात ते तयार केले गेले असावे, म्हणजेच ते 18 व्या शतकातील आहेत. तसेही नेरी येथील शिवमंदिर प्रसिध्द आहे. तेव्हाच्या भाविकांनी काही नवस बोलला असेल आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याने नवस फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी हे शिवलिंग तयार करून समर्पित केले असावे. जिल्ह्यातील काही भागात पांढरे आणि काळे दगड आढळतात. त्याच परिसरातील हे भाविक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हे शिवलिंग नेमके श्रावण महिन्यात मिळाल्याने भाविकांमध्ये अलोट श्रध्दा आणि आनंद आहे. उत्सुकतेपोटी अनेक भाविकांनी या शिवलिंगाचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here