पर्यावरण मित्र गिधाड पक्षांची घटती संख्या चिंताजनक…

देशात दिवसेंदिवस सर्वच स्तरातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अत्याधुनिक साधनसामग्री, कारखाने, जंगल तोड, वाढते औद्योगिकीकरण यांमुळे आकाश-पाताळ-पृथ्वी-निसर्ग-समुद्र पुर्णपणे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये येवुन ठेपला आहे.यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदुषण दिसून येते.मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गाचे संतुलन सुरक्षित ठेवण्याचे काम मुख्यत्वेकरून गिधाडांचे आहे.त्यामुळे गिधाड आपली भूमिका चोखपणे बजावुन निसर्ग निरोगी ठेवुन पृथ्वीचे रक्षण गिधाड करायचे व करीत आहे.त्यामुळे त्यांना निसर्गातील स्वच्छता दुत सुध्दा म्हणतात.परंतु भारतासाठी धक्कादायक बातमी म्हणजे भारतातील 90 टक्के गिधाडांची संख्या घटल्याने भारतीय निसर्गावर मोठे संकट आल्याचे दिसून येते.

आजच्या परिस्थितीत गिधाडांना वाचवीने काळाची गरज आहे.याकरीता पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणून गिधाडांची ओळख आहे.परंतु त्यांची घटती संख्या पाहता त्यांचे संवर्धन होवून संख्या वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन म्हणून पाळला जातो.गिधाडांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम बुद्धिजीवी मानवजातीनेच केले आहे. भारतात 6 भारतीय व 3 स्थलांतरित अशा 9 प्रजातीच्या गिधाडांचे अस्तित्व आहे.1980 च्या दशकापर्यंत देशात गिधाडांची संख्या ४ कोटी पेक्षा जास्त होती.मात्र डायक्लोफेनॅक सारख्या विषारी औषधांमुळे अवघ्या 15 -20 वर्षात 90 टक्के गिधाडे संपली.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारतात 19 हजार तर महाराष्ट्रात फक्त 800 गिधाड असल्याचे सांगितले जाते.काही प्रजातीतर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गाचे संतुलन निरोगी ठेवणाऱ्या या निसर्ग मित्रालाच आता वाचविण्याची वेळ आली आहे.

25-30 वर्षापुर्वी गिधाड मृत जनावरांचे जे मांस खायचे ते त्यांना पोषक व आहार युक्त होते.परंतु आधुनिक युगात गेल्या काही वर्षांपासून जनावरांना अनेक रोगांपासून वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे व इंजेक्शन देऊन त्यांचे प्राण वाचवले जाते.काही जनावरांना प्रजननासाठी व दुधाची मात्रा वाढवीण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा व इंजेक्शनचा वापर होतांना दिसतो व होत आहे.परंतु यांचा विपरीत परिणाम निसर्ग संरक्षक गिधाड याला भोगावा लागत आहे.कारण जी औषधे जनावरांना देण्यात येते ती औषधे जनावरे मृतपावल्यानंतर संपूर्ण जनावरे विषेली होतात.ही मृत जनावरे गिधाड खातात व त्यांना अनेक रोगांच्या यातना भोगुन  मृत्यूशी झुंज द्यावी लागते.

यामुळेच आज निसर्ग मित्र गिधाड यांची संख्या 90 टक्याने घटल्याचे दिसून येते.ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे.एका माहितीनुसार 1993 ते 2007 दरम्यान भारतीय प्रजाती असलेल्या पांढऱ्या पुठ्याचे गिधाडांची संख्या 99.9 टक्के नष्ट झाली आहे.याशिवाय भारतीय गिधाड व निमुळत्या चोचीचे गिधाड या प्रजातींची 99 टक्के संख्या कमी झाली आहे.म्हणजेच निसर्ग सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गिधाडांची संख्या कमी होने अत्यंत चिंताजनक बाब आहे.त्यामुळे गिधाडांच्या बहुतेक प्रजाती नामशेष होण्याची भीती पहाता;भारतीय निसर्ग मित्राला वाचविण्याची काळाची गरज आहे.

2020 ते 2025 पर्यंतच्या भारतातील गिधाड संवर्धनाच्या कृती आराखड्यानुसार भारतीय गिधाड फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र वनविभाग गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ही अत्यंत आनंदाची बाब आहे याचे मी स्वागत करतो.आंतराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र गिधाड यांना वाचविण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेच सोबतच संपूर्ण राज्य सरकार व केंद्र शासीत प्रदेशातील वनविभागाने गिधाडांना वाचवीन्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.आज आपण पहातो गिधाडच काय तर घार सारखे महाकाय पक्षी सुध्दा डोळ्यांनी दिसत नाही.अशाप्रकारे असे अनेक पशुपक्षी आहे ते लुप्त झाले आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.निसर्गाचे संतुलन बिघडल्याने पशुपक्षीच काय तर अनेक औषधी युक्त वनस्पती नामशेष झाली आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे बुद्धिजीवी मानवाने लक्षात ठेवले पाहिजे की या पृथ्वीतलावरील प्रत्येक वस्तू, जीवजंतू, पशुपक्षी व वनस्पती या सर्वच एकमेकांशी निगडित आहे.त्यामुळे आज निसर्गमित्र गिधाडांचे संवर्धन करणे गरजेचे सोबतच निसर्ग वाचविने तेवढेच आवश्यक आहे.यामुळे निसर्ग प्रफुल्लित रहाण्यास मोठी मदत होईल व सोबतच प्रदूषणावर सुध्दा मात करण्यास आपल्याला यश प्राप्त  होईल.  

रमेश कृष्णराव लांजेवार

माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर

मो: 9921690779

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here